जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी रत्नागिरीत कर्मचाऱ्यांचा एल्गार, मध्यवर्ती कर्मचारी समन्वय संघटनेच्या कर्मचाऱ्यांची बाईक रॅली

रत्नागिरी जिल्ह्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या अजूनही प्रलंबित आहेत. जिल्हा मध्यवर्ती कर्मचारी संघटनेतर्फे जिल्ह्यातील सर्व कर्मचारी निमशासकीय कर्मचारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी क्रांतीदिनी 9 ऑगस्ट रोजी भव्य बाईक रॅली काढून शासनाच्या धोरणांचा निषेध करणार आहे.

देशभरात जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी विविध आंदोलने होत असताना जिल्ह्यामध्ये शासनाच्या कर्मचारी मार्ग धोरणांचा जाहीर निषेध करण्यासाठी तसेच अन्य महत्त्वाच्या मागणीसाठी शासनाचे लक्ष वेधण्यात येणार आहे. भविष्यात पी. एफ. आर. डी. ए. कायदा रद्द व्हावा, जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, कामगार विरोधी सर्व कायदे रद्द करावेत.सर्व आस्थापनांमध्ये कंत्राटीकरण रद्द करावे तसेच तेथे नियमित भरती करावी त्याचप्रमाणे किमान वेतन हे 28 हजार रुपये करण्यात यावे, अशा मागण्या यावेळी करण्यात येणार आहेत.

लढणारे लढू देत आम्हाला फायदा मिळेल तेव्हा बघू, असे न म्हणता आपली नैतिक जबाबदारी म्हणून सर्व कर्मचाऱ्यांनी या बाईक रॅलीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन मध्यवर्ती कामगार संघटनेच्या समन्वय समितीतर्फे करण्यात येत आहे. यावेळी जुनी पेन्शन योजना छाप असलेली पांढरी टोपी सफेद शर्ट किंवा टी-शर्ट तसेच काळी पॅन्ट व भगिनींसाठी पांढरी साडी, असा गणवेश निर्धारित करण्यात आला आहे. रॅलीमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व लढाऊ कर्मचाऱ्यांनी दिनांक 9 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 वाजता सामाजिक न्याय भवन कुवार बाव नजीकच्या परिसरात प्रांगणात उपस्थित रहावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती कर्मचारी समन्वय समितीच्या अध्यक्ष व सचिवांकडून करण्यात आले आहे .

या बाईक रॅली सामाजिक न्याय भवन ते रत्नागिरी जयस्तंभपर्यंत काढण्यात येणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना स्ंघटनेच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेकडून देण्यात आली आहे. मागील काही महिन्यांपूर्वी मध्यवर्ती कामगार संघटनेच्या संपाला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे शासनाला समिती स्थापन करावी लागली होती. यापुढे शासनाला जुनी पेन्शन देण्यास भाग पाडू, असे मध्यवर्ती संघटनेतर्फे सांगण्यात येत आहे

महाबाईक रॅलीमध्ये जि.प.कर्मचारी संघ पूर्ण ताकदीनिशी उतरणार
जिल्हास्तरावर राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती, जिल्हा शाखा, रत्नागिरीच्या वतीने या बाईक रॅलीचे नियोजन करण्यात आले असून त्यामध्ये जि. प. कर्मचारी महासंघ, जिल्हा शाखा रत्नागिरी पूर्ण ताकदीनिशी सहभागी होणार आहे.