देवनार डंपिंग ग्राऊंड होणार कचरामुक्त

देवनार डंपिंग ग्राऊंड कचरामुक्त करण्यासाठी मुंबई महापालिका सरसावली असून जुन्या साठलेल्या कचऱयाची शास्त्राsक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी पर्यावरणपूरक ‘बायोमायनिंग’ प्रकल्प राबवण्यात येणार आहे. त्यासाठी जुन्या साठलेल्या दोन कोटी कचऱयाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी महापालिका तब्बल 94 लाख 51 हजार रुपये खर्च करणार आहे.

देवनार डंपिंग ग्राऊंडची क्षमता संपुष्टात आली असून सुमारे दोन कोटी मेट्रिक टन जुन्या साठलेल्या कचऱयाचे डोंगर उभे राहिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर युद्धपातळीवर देवनार डंपिंग ग्राऊंड कचरामुक्त करण्यासाठी पालिका प्रशासनाने पाऊल उचलले आहे. जुन्या साठलेल्या कचऱयाची शास्त्राsक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी खोल खड्डे खोदण्यात येणार आहेत. त्यानंतर त्या कचऱयातून ओला, सुका, प्लॅस्टिक, घातक कचऱयासह रासायनिक घटकांचे नमुने घेऊन त्याची प्रयोगशाळेत तपासणी केली जाणार आहे. या प्रयोगामुळे साचलेला कचरा आणि जमिनीची स्थिती याची माहिती पालिकेला मिळणार आहे. यासाठी पर्यावरणपूरक ‘बायोमायनिंग’ प्रकल्प राबवण्यात येणार आहे. या कामासाठी पालिकेने ऑक्टोबर 2023 मध्ये निविदा मागवून एन. एम. कन्सल्टंट-एसकेडब्ल्यू सॉईल अँड सर्वेयस प्रा. लि. या तज्ञ पंपनीची निवड करण्यात आली आहे.