नगर अर्बनच्या संचालकांची ठेवीदाराला मारहाण

नगर अर्बन बँकेकडे ठेवीचे पैसे मागण्यासाठी कर्जत येथील ठेवीदार महेश जेवरे मुंबई येथे गेले होते, त्यावेळी बँकेच्या संचालकांनी त्यांना शिवीगाळ करीत बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ठेवीदारांना पैसे परत देण्याऐवजी संचालक मंडळ ठेवीदारांना मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी देण्याचे त्यांचे धाडस वाढले आहे. यामुळे कर्जत तालुक्यात सर्वच व्यापारी बांधवांमध्ये संतापाची भावना व्यक्त केली आहे.

नगर अर्बन बँकेकडे महेश जेवरे यांच्यासह अनेकांच्या मोठय़ा प्रमाणामध्ये ठेवी अडकलेल्या आहेत. लाखो रुपये अडकलेले हे सर्व ठेवीदार सातत्याने पैसे मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. नगर अर्बन बँकेसमोर वारंवार त्यांनी आंदोलनही केले होते. काल महेश जेवरे हे मुंबई येथे रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा करण्यासाठी गेले होते. यावेळी नगर अर्बन बँकेचे चेअरमन अशोक कटारिया, संचालक ईश्वर बोरा व गिरीश लाहोटी हे उपस्थित होते. यावेळी गिरीश लाहोटी यांनी चेअरमन अशोक कटारिया व संचालक बोरा यांच्यासमोर महेश जेवरे यांना शिवीगाळ, मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. या सर्व घडलेल्या घटनेमुळे महेश जेवरे यांची प्रकृती बिघडली. या घटनेचे दृश्य सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाले आहेत. या घटनेनंतर महेश जेवरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना याबाबत निवेदन दिले असून, संबंधित लोकांवर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी केली.