एसटीत अस्वच्छता दिसल्यास डेपो मॅनेजरचा खिसा कापणार

एसटी म्हटलं की, धुळीने माखलेल्या काचा, फाटलेल्या सीट आणि आणि प्रवाशांनी पिचकारीचे मारलेले फटकारे हे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. पण ते आता लवकरच बदलणार आहे. स्वच्छ एसटीसाठी महामंडळाने आगार व्यवस्थापकांनाच दंडाचा दणका देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एखादी गाडी अस्वच्छ असल्याचे एसटीच्या तपासणी पथकाच्या निदर्शनास आल्यास सदरची गाडी ज्या आगाराची आहे. त्या आगार व्यवस्थापकाला तब्बल 500 रुपयांचा दंड लावला जाणार आहे. त्याची अंमलबजावणी 1 ऑक्टोबरपासून होणार आहे.

एसटीकडून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियान राबवले जात आहे. त्याअंतर्गत शंभरपैकी 10 टक्के गुण बसच्या स्वच्छतेला दिले जातात. तरीही सर्रास बस अस्वच्छ असल्याचे निदर्शनास येत असून त्याकडे अधिकाऱयांचे दुर्लक्ष होत आहे. त्याची गंभीर दखल महामंडळाने घेतली आहे.

बस स्थानक आणि बसची स्वच्छता पाहण्यासाठी एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयातून पालक अधिकारी, स्वच्छता अभियानाचे मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष, समिती सदस्य आणि विभाग नियंत्रक यांच्याकडे बसच्या स्वच्छतेची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी महिन्याला किमान पंधरा बसची तपासणी करणे अपेक्षित आहे. त्यांनी बस अस्वच्छ असल्याचे निश्चित केल्यानंतर आगार व्यवस्थापकांना दंड लागणार आहे.