अजित पवारांसह 9 आमदारांना अपात्र ठरवा राष्ट्रवादीची विधानसभा अध्यक्षांकडे याचिका

अजित पवार यांच्यासह मंत्रीपदाची शपथ घेणाऱया 9 आमदारांना अपात्र ठरवण्यात यावे, अशी याचिका राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दाखल केली आहे. तसे पत्रकच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जारी केले. ज्या वेळी या नऊजणांनी शपथ घेतली त्याच वेळी ते अपात्र ठरले असून यासंबंधित पत्र आम्ही निवडणूक आयोगालाही दिले असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. राष्ट्रवादीच्या ज्या 9 नेत्यांनी नुकतीच मंत्रीपदाची शपथ घेतली ते वगळता उर्वरित सर्व 45 आमदार हे आमच्यासोबत आहेत, असा दावाही त्यांनी केला.

याचिका आली, पण आमदारांची संख्या नाही
राहुल नार्वेकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून तशी याचिका आपल्याकडे आल्याची माहिती दिली. त्या याचिकेतील मुद्दय़ांचा अभ्यास करूनच आपण त्यावर भाष्य करू असे त्यांनी सांगितले. अजित पवार यांना किती आमदारांचे समर्थन आहे हे मला माहीत नाही. कारण त्यांची यादी माझ्याकडे आलेली नाही, असेही नार्वेकर यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेता निवडीचा अधिकार अध्यक्षांचाच
सभागृहात विरोधी पक्षनेत्याची निवड विधानसभा अध्यक्ष करतात. विरोधी पक्षनेता निवडीचा अधिकार हा अध्यक्षांचाच असतो. विधानसभेचे जे नियम आहेत त्यानुसार आणि संवैधानिक तरतुदीनुसार पुढील निर्णय घेणार आहे, असेही नार्वेकर यांनी विरोधी पक्ष निवडीबाबतच्या माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

उपमुख्यमंत्री, अजित पवार (बारामती)

मंत्री
धनंजय मुंडे (परळी), छगन भुजबळ (येवला), दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), आदिती तटकरे (श्रीवर्धन), हसन मुश्रीफ (कागल), अनिल पाटील (अमळनेर), धर्मरावबाबा आत्राम (अहेरी), संजय बनसोडे (उदगीर)

अजित पवार यांच्यासोबत असलेले आमदार
सुनील टिंगरे (वडगाव शेरी), सुनील शेळके (मावळ), अतुल बेनके (जुन्नर), अशोक पवार (शिरूर), सरोज अहिरे (देवळाली), नरहरी झिरवाळ (दिंडोरी), इंद्रनील नाईक (पुसद), किरण लहामटे (अकोले), नीलेश लंके (पारनेर), संग्राम जगताप (नगर शहर), शेखर निकम (चिपळूण), दत्ता भरणे (इंदापूर), अण्णा बनसोडे (पिंपरी), माणिकराव कोकाटे (सिन्नर), दीपक चव्हाण (फलटण)

अजित पवार समर्थक आमदारांची संख्या : 24
(14 आमदार औ 9 मंत्रिपदाची शपथ घेतलेले आमदार)

शरद पवार यांच्यासोबतअसलेले आमदार
जयंत पाटील (वाळवा), जितेंद्र आव्हाड (मुंब्रा), अनिल देशमुख (काटोल), रोहित पवार (कर्जत-जामखेड), प्राजक्त तनपुरे (राहुरी),
संदीप क्षीरसागर (बीड), दौलत दरोडा (शहापूर), नवाब मलिक (अणुशक्तीनगर), मकरंद पाटील (वाई), मानसिंग नाईक (शिराळा), सुमनताई पाटील (तासगाव), बाळासाहेब पाटील (कराड उत्तर), सुनील भुसारा (विक्रमगड), चेतन तुपे (हडपसर)
शरद पवार समर्थक आमदारांची संख्या : 14

कोणासोबत जाऊ?शरद पवार की अजित पवार? संभ्रमात असलेले आमदार
राजेंद्र शिंगणे (सिंदखेड राजा), राजेंद्र कारेमोरे (तुमसर), मनोहर चंद्रिकापुरे (अर्जुनी मोरगाव), चंद्रकांत नवघरे (वसमत), राजेश टोपे (घनसावंगी), नितीन पवार (कळवण), दिलीप बनकर (निफाड), दिलीप मोहिते (खेड आळंदी), आशुतोष काळे (कोपरगाव), प्रकाश सोळंखे (माजलगाव), राजेश पाटील (चंदगड), यशवंत माने (मोहोळ), बबन शिंदे (माढा), बाबासाहेब पाटील (अहमदपूर), बाळासाहेब आजबे (आष्टी)
संभ्रमात असलेल्या आमदारांची संख्या : 15