120 वर्षांत यंदाचा ऑगस्ट सर्वात कोरडा

ऑगस्ट महिना संपला, पण वरुणराजाने जराही कृपादृष्टी दाखवलेली नाही. मुंबईकरांवरील पाणीकपात सध्या टळली असली तरीही पावसाने अशीच ओढ दिल्यास भविष्यात पुन्हा पाणीकपातीचा सामना करावा लागू शकतो. देशभरातही अनेक राज्यांमध्ये दुष्काळी स्थिती असून गेल्या 120 वर्षांत यंदाचा ऑगस्ट महिना सर्वात कोरडा ठरल्याचे हवामान तज्ञांनी म्हटले आहे.  दरम्यान, सप्टेंबरच्या शेवटी 10 दिवस पाऊस कृपादृष्टी दाखवू शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

उद्या ईशान्येकडील आणि दक्षिणेकडील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 1901 पासून आतापर्यंत यंदाचा ऑगस्ट सर्वाधिक कोरडा ठरला असून ऑगस्टमध्ये पावसाची तूट मोठी असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. ऑगस्ट महिन्यात किमान 27.55 अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली. त्यामुळे ऑगस्ट महिन्याची नोंद सर्वाधिक उष्ण महिना अशी नोंद होऊ शकते. ऑगस्ट महिन्यात अतिशय कमी पावसाची नोंद झाली. ऑगस्ट महिन्यात मान्सूनचा तिसरा टप्पा सुरू असून हा महिना इतिहासातील चौथा मोठा मान्सून ब्रेक म्हणून नोंदवला जाऊ शकतो. ऑगस्टमध्ये 33 टक्क्यांहून कमी पावसाची नोंद झाली.

मान्सूनचा पाऊस 9 टक्क्यांनी कमी

मान्सूनच्या पावसाची दक्षिण हिंदुस्थानात 61 टक्के, मध्य हिंदुस्थान 44 टक्के तर उत्तर पश्चिम हिंदुस्थानात 35 टक्क्यांची तूट आहे. 29 ऑगस्टपर्यंत हिंदुस्थानात 241 मिमी इतका पाऊस होतो, परंतु यंदा केवळ 160 मिमी इतकाच पाऊस झाला. म्हणजेच यंदा मान्सूनचा पाऊस तब्बल 9 टक्क्यांनी कमी झाल्याचे हवामान विभागाच्या आकडेवरून स्पष्ट झाले आहे. सप्टेंबरमध्येही पाऊस सर्वसामान्य राहिला नाही तर गेल्या 8 वर्षांतील हा सर्वाधिक कमी पाऊस पडलेला महिना ठरेल.

पहिल्यांदाच ऑगस्टचे 12 दिवस बिनपावसाचे

यंदा 19 ऑगस्टपर्यंत केवळ 106.2 मिमी पावसाची नोंद झाली. या महिन्यात सलग बारा दिवस पाऊस न पडल्याचे गेल्या 14 वर्षांत पहिल्यांदाच घडले आहे. पावसाचा या महिन्यातील अनुशेष 40 टक्क्यांहून अधिक असू शकतो, असे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यप यांनी सांगितले.