ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचे पार्टस् कोण बनवतंय त्यांची नावे आणि पत्ते उघड करण्यास नकार… म्हणे, व्यावसायिक गोपनीयता!

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्सचे पार्ट कोण बनवतं, त्यांची नावे, पत्ते आणि संपर्क क्रमांक सांगण्यास इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या सरकारी कंपन्यांनी नकार दिला आहे. व्यावसायिक गोपनियतेचे कारण देत दोन्ही कंपन्यांनी ही माहिती नाकारली. दरम्यान, आधीच ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत संशयाचे धुके असताना संबंधित कंपन्यांकडून अशा प्रकारे लपवाछपवी करण्यात येत असल्याने ‘कुछ तो गडबड है’ अशी प्रतिक्रिया उमटू लागली आहे.

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटमध्ये वापरण्यात येणारे विविध पार्ट्स तयार करणाऱया कंपन्यांची नावे आणि या पार्ट्सचे वितरण करणाऱया पुरवठादारांची नावे तसेच संपर्क क्रमांक देण्याची मागणी करणारा अर्ज सामाजिक कार्यकर्ते व्यंकटेश नायक यांनी माहिती अधिकाराखाली केला होता. मात्र ही माहिती नाकारत अर्ज फेटाळण्यात आला.

कंपन्यांनी काय कारणे दिली?

– भारतीय राज्यघटनेतील 2005च्या माहिती अधिकार कायद्याच्या कलम 8(1) अंतर्गत अर्जदारांनी विचारलेली संवेदनशील माहिती गोपनीय राखण्याचा अधिकार आहे.
– कलम 7(9) अंतर्गत अशी संवेदनशील माहिती उघड करणे सरकारी डेटाच्या संरक्षणाच्या दृष्टीने धोकादायक ठरेल.
– ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या पार्टस्ची निर्मिती कोणत्या कंपन्या करतात याचे उत्तर दिले तर इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीच्या स्पर्धात्मक कामगिरीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
– ईव्हीएमच्या निर्मितीबद्दलची संवेदनशील माहिती उघड करणे व्यावसायिक गोपनियतेच्या दृष्टीने अत्यंत घातक ठरू शकते.
– मशीनचे डिझाईन उघड होईल आणि पार्ट तयार करणाऱया कंपन्यांसाठी ते हिताचे ठरणार नाही.
– ईसीआयएल आणि भेल या कंपन्या संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत येतात. या दोन्ही कंपन्या निवडणूक आयोगासाठी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची निर्मिती करतात. नायक यांनी कंपन्यांकडून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटसाठीच्या पार्ट्सच्या खरेदी आदेशाच्या प्रतीही मागितल्या होत्या.

कुणाच्या हिताचे रक्षण चाललेय?

मला कळत नाही की या कंपन्या देशातील कोटय़वधी मतदारांचे हित सोडून नेमके कुणाच्या हिताचे संरक्षण करत आहेत, असा सवाल माहिती नाकारण्यात आल्यानंतर व्यंकटेश नायक यांनी केला.
ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटसाठी लागणारे पार्ट्स कंपन्या बाहेरून न मागवता स्वतःच तयार करतात हे तरी कंपन्यांनी सांगायला हवे होते, असे नायक म्हणाले.

खरेदी आदेशाबाबत माहिती दिल्यास ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटसाठी लागणाऱया पार्ट्सबद्दलची माहिती उघड होईल आणि ते सरकारी कंपन्यांसाठी घातक ठरेल, असे उत्तर देण्यात आले. परंतु त्यांनी दिलेल्या उत्तराची स्वाक्षरी केलेली कॉपीदेखील आरटीआयच्या ऑनलाईन पोर्टलवर अपलोड केलेली नाही, याकडे नायक यांनी लक्ष वेधले.

गुप्त कोड तयार करणाऱ्या कंपन्यांवर भाजप नेत्यांची वर्णी

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड ही कंपनी ईव्हीएम मशीनमध्ये असणाऱया चिपसाठी गुप्त कोड तयार करते. अशा कंपनीवर भाजपचे राटकोट जिल्हा अध्यक्ष मनसुखभाई खाचलिया यांच्यासह चार पदाधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आल्याचे उघड झाले होते. या नियुक्तीवर माजी केंद्रीय सचिव ई.एस. शर्मा आणि विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप घेतला होता. तसेच या नेमणुकांबाबत काही आक्षेपार्ह वाटले नाही का, असा सवालही शर्मा यांनी निवडणूक आयोगाला केला होता.