अदानी समूहाच्या समभागांच्या शॉर्टसेलिंगमधून तुफानी नफा कमावल्याचा ईडीला संशय

हिंडेनबर्ग रिपोर्ट आणि अदानी समूहाशी निगडीत नवी माहिती उजेडात यायला लागली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर केलेल्या आर्थिक घोटाळ्याच्या आरोपांची स्वतंत्रपणे चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक तपासात ईडीला असे दिसून आले आहे की अदानी समूहाच्या शेअर्सच्या शॉर्ट सेलिंगमधून डझनभर कंपन्यांनी तुफानी नफा कमावला आहे.

ED ने जुलै 2023 मध्ये भारताच्या शेअर बाजार नियामक संस्था अर्थात सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाला (SEBI) सोबत प्राथमिक तपासातील काही बाबी कळवल्या आहेत. अदानी समूहावर आर्थिक अनियमिततेचा आरोप करणाऱ्या हिंडेनबर्ग अहवालाच्या प्रसिद्धीदरम्यान काही कंपन्यांनी शॉर्टसेलिंगमधून नफा कमावल्याचा आरोप आहे. या सर्व कंपन्या टॅक्स हेव्हन्स मानल्या जाणाऱ्या देशांतून आपले काम करत होत्या असं ईडीला दिसून आले आहे. टॅक्स हेवन देशांत गुंतवणूकदार, कंपन्या किंवा परदेशी गुंतवणूकदारांवर व्यवसाय करण्यासाठी फारच कमी किंवा शून्य कर आकारला जातो.

शॉर्ट सेलिंगद्वारे नफा कमावणाऱ्या या कंपन्यांमध्ये काही विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FPI) आणि काही संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) देखील आहेत. ईडीच्या म्हणण्यानुसार, या कंपन्यांनी हजारो कोटी रुपये कमवून काही बड्या मंडळींना फायदा करून दिला असल्याचा आरोप आहे. ही मंडळी कोण आहेत हे मात्र कळू शकलेलं नाहीये. शॉर्टसेलिंगद्वारे नफा कमावणाऱ्यांध्ये हिंदुस्थानातील एका खासगी बँकेसह 15 कंपन्या अथवा संस्थांचा सहभाग असल्याचे दिसून आले आहे.

शॉर्ट सेलिंग म्हणजे काय?

साधारणपणे, गुंतवणूकदार एखाद्या कंपनीच्या शेअर्समध्ये या आशेने पैसे गुंतवतो की जर शेअरची किंमत वाढली तर त्याचा नफाही वाढेल. पण शॉर्ट सेलिंग अगदी उलट आहे. जेव्हा कंपनीचे शेअर्स तोट्यात जातात तेव्हा शॉर्ट सेलिंगमध्ये नफा होतो.

कसे? यासाठी तुम्हाला आधी शेअर्स विकावे लागतील. तुम्ही म्हणाल की माझ्याकडे कोणतेही शेअर्स नाहीत, मग मी ते कसे विकू? यासाठी तुम्हाला तुमचा स्टॉक ब्रोकर मदत करतो. शेअर ब्रोकिंग करणारी कंपनी असो अथवा एखादी व्यक्ती. शॉर्ट सेलिंगसाठी ब्रोकर तुम्हाला मदत करतो. समजा तुम्हाला वाटते की XYZ कंपनीच्या शेअरची किंमत कमी होईल. अशा परिस्थितीत, तुम्ही तुमच्या स्टॉक ब्रोकरला तुम्हाला XYZ कंपनीचे 10रुपये किंमतीचे 10 शेअर्स कर्ज स्वरुपात घेण्यास सांगितले. हे शेअर्स तुम्ही त्रयस्थाला विकलेत तर त्यातून 100 रुपये मिळतील.

समजा काही वेळाने XYZ च्या शेअरची किंमत 8 रुपये झाली. या आपण या दराने 10 शेअर्स खरेदी केले तर आपल्याला ते 80 रुपयांना मिळतील. हे शेअर तुम्ही ज्या व्यक्तीला 100 रुपये दराने विकले होते त्याच्याकडूनही विकत घेऊ शकता किंवा खुल्या बाजारात दुसऱ्याकडून विकतही घेऊ शकतो. ज्या शेअरसाठी तुम्हाला 100 रुपये द्यावे लागत होते ते शेअर्स आता तुम्हाला 80 रुपयांना मिळतात. हे शेअर विकत घेून तुम्ही ज्या ब्रोकरकडून 10 शेअर्स उधार घेतले होते त्याला तुम्ही परत करता. या व्यवहारातून तुम्हाला 20 रुपयांचा नफा होतो. हा व्यवहार शेअर ट्रेडिंग पेक्षा जास्त आर्थिक जोखमीचा मानला जातो. ज्या संस्था किंवा व्यक्तींना माहिती असतं की एखाद्या कंपनीचे शेअर्स पडणार आहेत, त्या संस्था किंवा व्यक्ती याचा फायदा उचलून अशा प्रकारचे व्यवहार करत असतात.