Everest फिश करी मसाला बाजारातून हटवण्याचे आदेश, वाचा काय आहे कारण

हिंदुस्थानातील प्रसिद्ध मसाला कंपनी एव्हरेस्टच्या अडचणीत वाढ होणार आहे. सिंगापूर सरकारने एव्हरेस्टचा फिश करी मसाला बाजारातून तातडीने परत मागवण्याचा आदेश जारी केला आहे. सिंगापूरच्या फूड सेफ्टी एजन्सीने (एफएसए) एव्हरेस्टच्या मसाल्यांची तपासणी केली. या तपासणीदरम्यान एव्हरेस्टच्या फिश करी मसाल्यामध्ये Ethylene Oxide आढळून आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे हे मसाले आरोग्यासाठी घातक असल्य़ाचेही बोलले जात आहे.

दरम्यान फूड सेफ्टी एजन्सीच्या (FSA) म्हणण्यानुसार इथिलीन ऑक्साईड कीटकनाशक म्हणून शेतात वापरले जाते. त्यामुळे त्याचा वापर अन्नात करता येणार नाही. म्हणूनच सध्या सिंगापूरमध्ये अन्नामध्ये ते घालण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. याच कारणामुळे एव्हरेस्टचा फिश करी मसाला बाजारातून परत मागवण्यात आला आहे. आयातदार एसपी मुथिया अँड सन्स पीटीईला बाजारातून सर्व उत्पादने परत मागवण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे.

सिंगापूर सरकारच्या म्हणण्यानुसार या मसाल्याच्या सेवनाने आरोग्याला थेट हानी होत नाही, पण जास्त दिवस सेवन केल्यास नुकसान होऊ शकते. त्यामुळे ज्यांनी या मसाल्याचे सेवन केले आहे किंवा अद्यापही करत आहेत त्यांनी ताबडतोब त्याचा वापर थांबवावा. तसेच हे मसाले खाल्याने जर कोणाला त्रास होत असेल तर त्यांनी लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. असे सिंगापूर सरकारकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान एव्हरेस्ट कंपनीने या वादावर अद्याप कोणतेही वक्तव्य केलेले नाही. एव्हरेस्ट ही एक भारतीय MNC कंपनी आहे, ज्याची वार्षिक नफा सुमारे 500 कोटी रुपये आहे.