लोकशाही संकटात असल्याचा भ्रम देशातूनच पसरवला जात आहे, हरीश साळवे यांचा आरोप

हिंदुस्थानात लोकशाहीचा आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा मृत्यू झाला असल्याचा भ्रम हा देशाची प्रगती रोखण्यासाठी पसरवला जात असल्याचा आरोप ज्येष्ठ विधीज्ञ हरीश साळवे यांनी केला आहे. हा भ्रम देशातूनच पसरवला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये साळवे यांनी म्हटले की हिंदुस्थानची छबी बदलत आहे. आपली जागा इतर देशाने घ्यावी असे कोणत्याही देशाला आवडणार नाही, उदा. आपला शेजारी राष्ट्र असलेला चीन. हिंदुस्थानचा चीनशी थेट आर्थिक संघर्ष आहे. चीनसारखे देश कोर्टाचा वापर करतात असा आरोप साळवे यांनी केला आहे.

साळवे यांनी म्हटले आहे की हिंदुस्थानच्या आर्थिक प्रगतीबाबत कोणी बोट दाखवू शकत नाही. यामुळे हिंदुस्थानात लोकशाहीची हत्या होत असल्याचा आरोप केला जातो. हिंदुस्थानातच उभे राहून हिंदुस्थानात लोकशाहीची हत्या होत असल्याचा आरोप केला जातोय हीच लोकशाही देशात जिवंत असल्याची निशाणी असल्याचे साळवे यांनी म्हटले आहे. नीरव मोदी आणि विजय मल्ल्याबाबत बोलताना साळवे यांनी म्हटले की, या दोघांना परत हिंदुस्थानात आणण्यासाठीची प्रक्रिया अधिक वेगाने करण्यासाठी हिंदुस्थानतर्फे सगळे प्रयत्न केले जात आहेत. या दोघांना हिंदुस्थानात आणण्यासाठी विलंब होत असल्याने युके आणि हिंदुस्थानमधील मुक्त व्यापार करारालाही विलंब होत आहे. या दोन आरोपींना हिंदुस्थानात आणल्याशिवाय युकेसोबत करार करण्या हिंदुस्थान तयार नाहीये आणि हा करार व्हावा यासाठी युके फार आग्रही आहे असे साळवे यांनी म्हटले आहे.