चंद्रपूरच्या माजरी गावात अन्नातून विषबाधा; 150 जण रुग्णालयात दाखल

चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी गावात अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. विषबाधा झालेल्यांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत सुमारे 150 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.

माजरी येथे शनिवारी नवसाची पूजा ठेवण्यात आली होती. या पुजेनिमित्त रात्री गावात जेवण ठेवण्यात आले होते. या पुजेत आणि जेवणात सुमारे 500 जण सहभागी झाले होते. गावकऱ्यांनी जेवण केले आणि ते घरी गेले. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास अनेकांना अस्वस्थ वाटू लागले. सुमारे 100 जणांना असा त्रास होता. त्यामुळे अन्नातून विषबाधा झाल्याचे समजले. त्यानंतर विषबाधा झालेल्यांची संख्या वाढत गेली.

आतापर्यंत सुमारे 150 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गावातील आणि जवळील रुग्णालयात जागा नसल्याने अनेकांना भद्रावती आणि वरोरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी अन्नातून विषबाधा झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम ठेवताना अन्न व औषध प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते. या विभागाशी संपर्क साधला असता अन्न व औषध प्रशासन अधिकारी गिरीश सातकर यांनी यासाठी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे सांगितले. तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी जात असून नेमके कारण चौकशीनंतर स्पष्ट होईल, असेही सांगितले.