पालकांनो तुमच्यासाठी… मुलांना मोबाईलपासून ठेवा दूर

लहान मुलांना लागलेली मोबाईलची सवय घातक आहे. अशावेळी जर मुलांचे कौन्सिलिंग केले तर मुलांची सवय कमी होऊ शकते. मुले मोठय़ांच्या मार्गदर्शनाखाली छंद जोपासू शकतात.

जीन पायगेट या स्विस मानसशास्त्रज्ञाने मुलांमधील समज संपादनाचा सखोल अभ्यास केला आहे. घरातील प्रत्येक सदस्याचे विचार आणि वागणूक भिन्न असते. आता हीच गोष्ट बघा मोबाईलने सगळय़ांना वेड लावले. प्रत्येक आईला घरात खूप कामे असतात आणि वडील कामावर जातात. काही ठिकाणी आईवडील दोघेही कामावर जातात. विभाचे विभक्त कुटुंब. नवरा कामावर गेला की, घरातील कामे आटपून तिला इतर कामे करावी लागायची.मुलगा पंटाळायचा, पण कामाच्या नादात ती मुलाकडे दुर्लक्ष करायची आणि त्याला शेजारच्या वृद्ध गंगुबाईकडे पाठवायची. मुलगा त्या गंगुबाईकडच्या मोबाईलवर गेम खेळायचा. त्याला मोबाईलचे चांगले व्यसन जडले, पण त्यामुळे का होईना घर शांत राहते असे तिला वाटायचे. मोबाईल बिघडला त्या वेळी मुलाची चिडचिड वाढली ती इतकी टोकाला गेली की, त्याने आपल्या शाळेतील शिक्षिकेचा मोबाईल चोरला. तो मोबाईल घरी घेऊन आला आणि रस्त्यात सापडला अशी बतावणी केली. आईवडील खूश त्यांनी फार चौकशी केली नाही. मुलगा अभ्यास करीत नाही ही विभाची तक्रार होती. नवरा वैतागलेला असायचा. त्यामुळे तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसायचा. 

मला भेटायला आली आणि म्हणाली, ‘‘ताई मला काही उपाय सांगा. माझा मुलगा चांगला आहे, पण त्याला खाताउठता मोबाईल लागतो. चिडचिड करतो. सारे जग मोबाईल आणि कॉम्प्युटरने वेडे झाले आहे. त्यामुळे अनेक गुन्हे आणि गुन्हेगार वाढले.’’ 

मी म्हणाली, ‘‘तुझ्या मुलाने जेव्हा घरात मोबाईल आणला तेव्हा तू सखोल चौकशी का केली नाहीस? कसा मिळाला हे का विचारले नाहीस?’’ 

फिदीफिदी हसत ती म्हणाली, ‘‘मी पोलीस थोडीच आहे.’’ 

तेवढय़ात तिचा मुलगा आला. मी त्याला विचारले, ‘‘बाळा तुझ्या आईला मोबाईलचे फार काwतुक, दाखव मला.’’ 

त्याचा चेहरा फुलला त्याने तो मोबाईल माझ्या हातात ठेवला. 

विभा बघत होती. मी लगेच एक कॉल केला आणि बोलणे झाल्यावर मुलाला म्हणाली, ‘‘शाळेतील बाईचा हा मोबाईल आहे त्यांना परत कर. यावर असंख्य कॉल आले, पण तू ते पह्न घेणे टाळले. मला सांग हे चुकीचे आहे ना ?’’ 

तो वरमला आणि त्याने चुकलो ते मान्य केले. अर्थात, त्याच्या आईवडिलांचीही चूक होती. कारण कामाच्या नादात त्यांनी मुलाकडे दुर्लक्ष केले होते. 

मी म्हटलं, ‘‘तुला सगळय़ात जास्त कोण आवडतं?’’ 

‘‘अब्दुल कलाम.’’ 

‘‘खूप अभ्यास करून ते महान वैज्ञानिक, मिसाईल मॅन म्हणून जगप्रसिद्ध झाले. तू नुसता मोबाईलवर गेम खेळत राहिला तर तसा घडशील का? बघ तुझे आईबाबा तुझ्यासाठीच कष्ट करतात  ना?’’ 

आईवडीलही चुकले होते, पण वेळ गेली नव्हती. शाळेतील शिक्षिकेला जेव्हा हा प्रकार समजला तेव्हा त्या मुलाचे काwन्सिलिंग केले गेले. आता त्या मुलाची सवय कमी झाली आणि तो शिक्षिकेच्या मार्गदर्शनाखाली आपले छंद जोपासत आहे. आईवडीलही मुलाला वेळ देत आहेत. सुधारणा होतात. वेळ लागतो, पण बदल होतात.

प्रा. वर्षा चोपडे

(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस, कोचीकेरळच्या महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी आहेत.) 

[email protected]