मूर्ती घडवता घडवता बाप्पा पावला , अरुण दत्ते यांच्या मूर्तींना देशभरातून मागणी

हातात पैसा नव्हता त्यावेळी सायन ते परळच्या कार्यशाळेचे अंतर भरपावसात पायी पार करणाऱ्या, पोटात फक्त वडापाव ढकलून 18-18 तास काम करणाऱया मूर्तिकार अरुण दत्ते यांच्या हातातील कलेवर मूर्ती घडवता घडवता बाप्पा प्रसन्न झाला आणि हातातली ही कला बाप्पाच्या रूपाने देशभरात पोहोचली आहे.

लहानपणापासून मूर्ती घडवण्याची आवड असलेल्या अरुण दत्ते यांनी 1997 पासून प्रसिद्ध मूर्तिकार विजय खातू यांच्या परळ वर्कशॉपमधील कारखान्यात मूर्तिकलेचे धडे गिरवायला सुरुवात केली. दूध, पेपर टाकून, पीसीओवर काम करता करता कारखान्यात किती पैसे मिळतील याकडे लक्ष न देता आवडीला मेहनत, जिद्द आणि चिकाटीची जोड दिली. 18-18 तास चिकाटीने एकाच जागेवर बसून लहान शाडूच्या मूर्तीपासून ते मोठय़ा मूर्तीपर्यंत प्रवास सुरू झाला. 2008 पर्यंत हा प्रवास सुरू होता. 2010 पासून दत्ते यांनी लालबाग येथील गणसंकुलात स्वतः भाडय़ाची जागा घेत मूर्ती घडवायला सुरुवात केली.

11 मूर्तींपासून ते 125 मंडळांपर्यंतचा प्रवास

पहिल्या वर्षी 11 मूर्तींपासून सुरुवात करणाऱया दत्ते यांच्या मूर्ती आज देशाच्या कानाकोपऱयात जातातच, पण त्याचबरोबर मुंबई आणि मुंबईबाहेरच्या 125 मोठय़ा मंडळांच्या मूर्तीही ते घडवतात. अगदी परळचा महाराजापासून ते भिवंडीचा महाराजापर्यंत मंडळांची यादी मोठी आहे. त्यांच्याकडे आज 50 ते 60 कलाकार मूर्ती घडवत आहेत.

कला आणि कलाकारही जगावा!

कोकणात, राज्यात हातात कसब, कला असणाऱ्या मूर्तिकारांची कमी नाही. मात्र, कलेचे रूपांतर पोटापाण्याच्या कलेत करताना मोठी दमछाक होते. खासगी जागांचे भाडे परवडत नाही. त्यामुळे सरकारने मैदानांवर किंवा मोकळय़ा जागांवर सवलतीच्या दरात मंडप उभारण्याची परवानगी द्यावी. त्यामुळे कलेबरोबरचे आर्थिक गणित जुळेल आणि कला व कलाकार दोन्हीही सन्मानाने जगतील, अशी विनंती दत्ते यांनी राज्य सरकारकडे केली.