कोकणात जाणाऱया चाकरमान्यांना टोलमाफीचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. मात्र वाहनधारकांच्या गाडीच्या काचेवर दर्शनी भागात फास्ट टॅगचा स्टिकर असल्याने गाडी टोल नाक्यावर पोहोचताक्षणी संबंधिताच्या फास्टटॅग खात्यातून टोलचे पैसे कापले गेले आहेत. त्यामुळे वाहनधारकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्याची दखल परिवहन विभागाने घेतली असून चाकरमान्यांचे फास्ट टॅगमधून गेलेले पैसे परत मिळवून देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र लिहिणार आहे. परिणामी अनेक वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
राज्य सरकारने कोकणात जाणाऱया चाकरमान्यांसाठी 15 सप्टेंबरपासून टोलमाफी जाहीर केली आहे. तरीही गणेशभक्तांच्या वाहनांवरील फास्ट टॅगमधून परस्पर टोलची रक्कम कापली जात आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी असून त्याबाबतच्या तक्रारी परिवहन विभागाकडे आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांच्या खिशाला झळ बसू नये म्हणून ज्यांच्या फास्ट टॅगमधून कापले गेले असतील त्यांना ती परत मिळावी म्हणून आपण सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र पाठवणार असल्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी सांगितले. दरम्यान, सरकारने टोलमाफी जाहीर केल्यानंतर संबंधित टोल नाक्यावर सरसकट टोलमाफी देणे अवश्यक आहे. कारण सरकारने जेवढय़ा दिवसांची टोलमाफी जाहीर केली आहे, तेवढा कालावधी त्यांना वाढवून मिळतो, असेही त्यांनी सांगितले.