चाकरमान्यांची दुसऱया दिवशीही लटकंती! सीएसएमटी-सावंतवाडी एक्स्प्रेसला तब्बल सहा तासांचा विलंब

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱया चाकरमान्यांची सोमवारी दुसऱया दिवशीही मोठी लटकंती झाली. मुंबईहून सुटलेल्या आठ-दहा गाडय़ांना दोन-तीन तासांचा लेटमार्क लागला. त्यामुळे आपल्या कुटुंबकबिल्यासह दाटीवाटीने रविवारी रात्री गाडीत बसलेले प्रवासी चक्क दुपारी कोकणात पोहोचले. समोरून येणाऱया गाडय़ांबरोबरच लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाडय़ांना ट्रक उपलब्ध करून देण्यासाठी गणपती विशेष गाडय़ांना वारंवार सायडिंगला टाकले जात होते. त्यामुळे गाडय़ांना होणारा विलंब पाहून चाकरमानी संताप व्यक्त करत होते.

कोकण रेल्वे मार्गावर चाकरमान्यांच्या सोयीसाठी रेल्वेकडून जवळपास तीनशेहून अधिक गणपती विशेष गाडय़ा चालवल्या जात आहेत. मात्र रेल्वेचा नियोजन शून्य कारभार आणि रोहाच्या पुढे कोकण रेल्वे मार्गावर एकच ट्रक असल्याने चाकरमान्यांची सोय कमी आणि गैरसोयच अधिक होत असल्याचे चित्र आहे. नऊ-दहा तासांच्या प्रवासासाठी तब्बल 14-15 तास लागत असल्याने दाटीवाटीने बसलेल्या प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली. सकाळी पोहोचणाऱया गाडय़ा दुपारपर्यंत रेंगाळत असल्याने प्रवाशांची चांगलीच उपासमार झाली. तसेच अनेक गाडय़ांमधील पाणी संपल्याने चाकरमान्यांनी रेल्वेच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

वंदे भारतने वाट अडवली

चाकरमान्यांनी खचाखच भरलेली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सावंतवाडी ही गाडी चार तास विलंबाने पहाटे चारच्या सुमारास सुटली. लोकमान्य टिळक टर्मिनस-मडगाव या गाडीचे रात्री 10.15 ही सुटण्याची वेळ असतानाही गाडी तब्बल सहा तास उशिरा म्हणजे पहाटे चारच्या सुमारास कोकणसाठी रवाना झाली, तर एलटीटी-कुडाळ ही गाडी रात्री एक वाजता निघाली. प्रवाशांनी खचाखच भरलेल्या या गाडय़ा आधीच विलंबाने धावत होत्या. त्यातच पहाटे 5.25 वाजता सीएसएमटीहून मडगावसाठी सुटलेल्या गाडीला रेल्वेने प्राधान्य दिल्याने आधीच विलंबाने धावणाऱया गाडय़ा सायडिंगला टाकल्या. त्यामुळे वंदे भारत ट्रेन केवळ अर्धा तास विलंबाने मडगावला पोहोचली. त्याचा इतर गाडय़ांना मात्र चांगलाच फटका बसला.

 सीएसएमटी-सावंतवाडी एक्स्प्रेसचे सुटण्याची वेळ रात्री 12.02 असतानाही गाडी तब्बल चार तास विलंबाने सुटली. त्यामुळे सदरची गाडी सकाळी 10 च्या सुमारास वैभववाडी येथे पोहोचणे अपेक्षित होते, मात्र ती दुपारनंतर चार वाजता वैभववाडीला पोहोचल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

या गाडय़ांना लेटमार्क

  •  सीएसएमटी-मडगाव
  •  एलटीटी-मडगाव
  •  एलटीटी-कुडाळ
  •  दिवा-रत्नागिरी
  •  मुंबई सेंट्रल-सावंतवाडी
  •  दादर-सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस
  •  सीएसएमटी-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस
  •  सीएसएमटी-मडगाव मांडवी एक्स्प्रेस
  •  एलटीटी-थिविम नेत्रावती एक्स्प्रेस
  •  सीएसएमटी-मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस