हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या बीएसएफ जवानाला अटक, मोठे खुलासे होण्याची शक्यता

गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयसाठी गुप्तहेरी करणाऱ्या नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एटीएसने पाकिस्तानसाठी गुप्तहेरी करणाऱ्या एका बीएसएफ जवानाला अटक केली आहे.

या जवानाचं नाव निलेश वालिया असं आहे. गुजरात एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, निलेश हा हनी ट्रॅपमध्ये अडकला असून त्याने सीमा सुरक्षेसंबंधित महत्त्वाची माहिती आयएसआयला पुरवत होता. त्याबदल्यात त्याला 25 हजार रुपयेही मिळाले होते. निलेश हा अदिती नावाच्या फेक प्रोफाईलमधल्या पाकिस्तानी हँडलरच्या संपर्कात आला. त्यानंतर त्याने या प्रोफाईलवर गुप्त माहिती पाठवली.

निलेश याच्या मोबाईलचा एफएसएल अहवाल तपासल्यानंतर ही बाब उघड झाल्याचं एटीएसचं म्हणणं आहे. अद्याप त्याची कसून चौकशी होत असून अजून मोठे खुलासे व्हायची शक्यता आहे. गुप्तहेरांचं जाळंच या ठिकाणी कार्यरत असल्याची शंका एटीएसने व्यक्त केली आहे.