आमचा आणि स्थानिकांचा दबाव नसता तर डिलाईल पुलाला आणखी विलंब झाला असता!

लोअर परळ रेल्वे स्थानकाजवळील डिलाईल पुलाच्या पूर्व दिशेची एक मार्गिका रविवार 17 सप्टेंबरपासून वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की जर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि स्थानिकांचा दबाव नसता तर हा पूल खुला होण्यास आणखी विलंब झाला असता. आदित्य ठाकरे यांनी हा पूल वेळेत सुरू व्हावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. जवळपास प्रत्येक महिन्याला त्यांनी या पुलाच्या कामाची पाहणी करून प्रगतीचा सातत्याने आढावा घेतला होता. रेल्वे विभागाचे गचाळ काम आणि मिंधे-भाजप सरकारने केलेला घोटाळा यामुळे या पुलाचे काम रखडले होते. यामुळे मुदतीच्या 2 महिन्यानंतर हा पूल खुला करण्यात आला, तोही पूर्णपणे खुला करण्यात आला नसून पूर्व आणि पश्चिम बाजूची प्रत्येकी एक-एक मार्गिका खुली करण्यात आली आहे.

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या ‘जी/दक्षिण’ विभागात लोअर परळ रेल्‍वे स्‍थानकाजवळ, ना. म. जोशी मार्ग आणि गणपतराव कदम मार्गावर डिलाईल रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या पुलावर ना. म. जोशी मार्गावरुन येणारे 2 आणि गणपतराव कदम मार्गावरुन येणारा 1 असे तीन पोहोच रस्‍त्‍यांचे बांधकाम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत आहे. पैकी, पश्चिम दिशेची मार्गिका याआधीच दिनांक 1 जून 2023 रोजी खुली करण्यात आली होती. असे असले तरी, ना. म. जोशी मार्गावरील लोअर परळ आणि करी रोड स्थानकांना जोडणारा पूर्व दिशेला स्थित मार्ग हा वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. या मार्गावरील दोन्ही बाजुपैकी किमान एक मार्गिका सुरू करा अशी सातत्याने मागणी केली जात होती. किमान ही मार्गिका गणेशोत्सवपूर्वी तरी सुरू करा अशी मागणी केली जात होती मुंबईकर नागरिकांची वाहतुकीची सोय व्हावी, या उद्देशाने डिलाईल पुलाची पूर्व बाजूस असलेली एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्याचा निर्णय सर्व संमतीने घेण्यात आला असे रविवारी मुंबई महानगरपालिकेने जाहीर केले.

1 जून 2023 रोजी पश्चिम दिशेची मार्गिका उपलब्ध करून दिली होती तर आता पूर्व बाजूची एक मार्गिका खुली झाल्याने वाहतुकीवरचा ताण कमी होणार आहे. दुसर्‍या मार्गिकेचे काम पूर्ण होईपर्यंत या एकाच मार्गिकेवरून दोन्ही दिशेची वाहतूक सुरू राहणार आहे. आमदार सुनील शिंदे म्हणाले की, मागील काही दिवसांपासून हा पूल खुला व्हावा म्हणून पाठपुरावा करण्यात येत होता. आज सुरू झालेल्या मार्गिकेमुळे लोअर परळ, करी रोड या भागातील नागरिकांसोबतच दक्षिण मुंबईकडे प्रवास करणाऱ्या नागरिकांची सुविधा होईल. विशेषतः श्री गणेश उत्सवामध्ये भाविकांची आणि वाहनांची वाढती संख्या पाहता ही मार्गिका खुली होणे महत्त्वाचे होते. पालकमंत्री, सर्व लोकप्रतिनिधी, महानगरपालिका प्रशासन तसेच स्थानिक पोलीस आणि नागरिक यांच्या समन्वयातून व सामंजस्यातून ही मार्गिका खुली झाली, प्रयत्नांना यश आले, असे आमदार शिंदे यांनी नमूद केले.

ऑगस्ट महिन्यात पावसाची उघडीप मिळाल्याने या पुलाचे काम वेगाने करणे शक्य झाले. रेल्वे परिसराला जोडून असणारे ना. म. जोशी मार्गावर अप आणि डाऊन अशा दोन्ही दिशेचे गर्डर उभारण्याचे काम ऑगस्ट महिन्यात पूर्ण करण्यात आले. त्यापाठोपाठच मास्टिक, रॅम्प, कॉंक्रिटीकरण, रंगकाम, पथदिव्याची कामे केली. शेवटच्या टप्प्यातील डांबरीकरणाचे कामही पूर्ण करून ही पहिली मार्गिका सुरू झाली. पूर्व दिशेला 90 मीटर रेल्वेचा भाग आहे. तर 225 मीटरचा भाग मुख्य भाग आणि खाली जमिनीशी जोडणारा कॉंक्रिटचा भाग आहे. पैकी कॉंक्रिटचे आणि डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यासोबतच संरक्षण कठडे, पथदिवे आणि रंगकाम यासारखीही कामे पूर्ण झाली आहेत असे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.