Haldwani Violence – दंगलीचा सूत्रधार मास्टर माईंड अब्दुल मलिकडून 2.44 कोटींची वसुली करणार

उत्तराखंडमधील हल्दवानी येथे 8 फेब्रुवारी म्हणजेच गुरुवारी बेकायदेशीर मदरसा आणि शेजारील मशीद पाडल्यानंतर हिंसाचार उसळला होता. या हिंसाचारात दोन जणांचा मृत्यू झाला आणि जवळपास 250 जण जखमी झाले होते. या हिंसाचारानंतर पोलिसांनी दंगल माजवणाऱ्याना अटक करण्यास सुरुवात केली असून सोमवारी रात्रभर पोलिसांनी छापेमारी केली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आतापर्यंत 25 हून अधिक जणांना अटक केली आहे. या हिंसाचाराचा मास्टर माईंड अब्दुल मलिक असून हल्द्वानी दंगलीत झालेल्या नुकसानीची जबाबदारी त्याच्या डोक्यावर टाकण्यात आली आहे. या हिंसाचारात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी नगरपालिकेने अब्दुलला नोटीस बजावली आहे. त्याच्याकडून 2.44 कोटींची वसुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नगर पालिका आयुक्त पंकज उपाध्याय यांनी एक नोटीस जारी केली असून त्यांनी नुकसानीची रक्कम जमा करण्यासाठी 15 फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली आहे. दंगलीदरम्यान नगर पालिकेच्या संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले असून घटनास्थली असलेल्या ट्रॅक्टर, जीपसह काही वाहनांना पेटवून देण्यात आले आहे असे या नोटीसमध्ये म्हटले आहे. हल्द्वानी प्रशासनाने वनभुलपुरा भागातील मदरसा आणि मशीद बेकायदेशीर घोषित केल्यामुळे ते पाडण्यात आले. मात्र, या कारवाईला या भागातील रहिवाशांचा तीव्र विरोध केला होता. या दंगलीत 50 हून अधिक पोलिस जखमी झाले, अनेक प्रशासन अधिकारी, पालिका कर्मचारी आणि पत्रकारही गोळीबारात अडकले होते. दंगलखोरांनी अधिकाऱ्यांवर दगडफेक केली त्यामुळे पोलिसांना अश्रूधुराच्या कांड्या फोडाव्या लागल्या. जमावानं पोलीस ठाण्याबाहेरील वाहने पेटवली होती. बुलडोझरने अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त केल्यानंतर संतप्त झालेला जमाव रस्त्यावर उतरला होता. त्यांनी बॅरिकेड्स तोडून पोलिसांवर हल्ला केल्यानं परिस्थिती चिघळली. त्यानंतर जमावाने पोलीस, पालिका कर्मचारी आणि पत्रकारांवर दगडफेक केली होती.