मोदींना निवडणूक बंदी घालण्याच्या याचिकेवर आज सुनावणी

हिंदू देवदेवता, पूजास्थळे, शीख देवता आणि शीख प्रार्थनास्थळे यांच्या नावाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मते मागितल्याच्या आरोपाखाली मोदींना पुढील सहा वर्षे निवडणूक लढवण्यावर बंदी घालावी, अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आजपासून सुनावणी होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

वकील आनंद एस. जोंधळे यांनी ही याचिका दाखल केली आहे. मोदींनी   राम मंदिराचे लोकार्पण आणि कर्तारपूर साहिब कॉरिडॉरही विकसित केल्याचे सांगितले. तसेच  लंगरमध्ये वापरल्या जाणाऱया पदार्थांवरील जीएसटीही हटवण्यात आल्याचे सांगितले. हे लक्षात घेता मोदींनी केवळ हिंदूच नव्हे तर शीख देवतांच्या आणि त्यांच्या प्रार्थनास्थळांच्या नावावर मते मागितल्याचे याचिकेत म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयातही याचिका

काँग्रेस सत्तेवर आल्यास लोकांची सर्व साधनसंपत्ती मुसलमानांकडे वळवली जाईल अशा आशयाचे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान येथील प्रचारसभेत केले. त्यांनी हे विखारी विधान जातीय हिंसाचार आणि रक्तपात घडवण्याच्या हेतूनेच केले असून सर्वोच्च न्यायालयाने या भाषणाची स्वतःहून दखल घ्यावी आणि त्यांना पुढची सहा वर्षे निवडणूक लढवण्यावर बंदी घालावी आणि त्यांच्यावर खटला चालवावा अशी मागणी संयुक्त किसान मोर्चाने सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे.