कोल्हापूरात पावसाचे धूमशान, रेड अलर्ट जारी; पंचगंगा इशारा पातळी ओलांडणार

जिल्ह्यात आजही संततधार आणि धुवांधार पावसाचे धूमशान सुरूच आहे. त्यामुळे आज दुपारपासून प्रशासनाने जिह्याला ‘रेड अलर्ट’ दिला आहे. पंचगंगा नदी कोणत्याही क्षणी इशारा पातळी ओलांडण्याच्या स्थितीत आहे. सायंकाळी पंचगंगेची पाणीपातळी 38.5 झाली होती. जिह्यातील धरणेही 80 ते 90 टक्के भरली आहेत. आतापर्यंत 82 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर, 8 राज्यमार्गासह एकूण 25 मार्ग वाहतुकीस बंद झाले आहेत. शिवाय जिह्यात 54 घरांची पडझड झाली आहे. दरम्यान, नदीकाठच्या गावांना स्थलांतराच्या नोटिसा बजावण्यात आल्या असून, एनडीआरएफची पथके तैनात केली आहेत.

गेल्या चोवीस तासांत जिह्यात ठिकठिकाणी अतिवृष्टी झाली असून, सरासरी 46.8 मि.मी. व गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 105.4 मि.मी. पाऊस झाला आहे. सध्या 26 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता तो आज दुपारनंतर रेड अलर्ट करण्यात आला आहे. दरम्यान, चिखली, आंबेवाडी गावांतील ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी स्थलांतर होण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तांदूळवाडी (ता. पन्हाळा) येथील 7 कुटुंबांतील 29 जणांना त्यांच्या नातेवाईकांच्या घरी तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले आहे.

आज दिवसभरात पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत सव्वा फुटाची वाढ झाली. सकाळी सातच्या सुमारास 37 फुटांवर असलेली ही पाणीपातळी सायंकाळी 7 च्या सुमारास 38 फूट 5 इंच झाली होती. नदीची इशारा पातळी 39 तर धोका पातळी 43 फूट आहे. शहरात पंचगंगा घाटावर नदीचे पात्राबाहेर पडलेले पाणी गायकवाडवाडा परिसरात आल्याने, छत्रपती शिवाजी पुलाकडून शहरात गंगावेशकडे जाणारा रस्ताही बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आला आहे. दरम्यान, राधानगरी, वारणा, दूधगंगा, तुळशी या मोठय़ा धरणासह लहान व मध्यम अशा एकूण 15 धरणसाठय़ात सध्या 56.66 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. सध्या राधानगरी – 1400, वारणा – 900, कासारी – 500, घटप्रभा – 3993, जांबरे – 1084 आणि कोदेमधून 1096 क्युसेक विसर्ग सुरू होता.

जिल्ह्यात सरासरी 46.8 मि.मी. पाऊस

गेल्या चोवीस तासांत जिह्यात सरासरी 46.8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक गगनबावडा तालुक्यात 105.4 मि.मी. पाऊस झाला. तसेच हातकणंगले – 25.6, शिरोळ – 15.6, पन्हाळा – 53.1, शाहूवाडी – 55.9, राधानगरी – 65.4, करवीर – 44.7, कागल – 43.8, गडहिंग्लज – 31.3, भुदरगड – 62.2, आजरा – 58.9 आणि चंदगड तालुक्यात 61.8 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद आहे.