प्रियकर तुरुंगात, प्रेयसी महिला सेवा केंद्रात! आंतरधर्मीय प्रेम अडकले ’पोक्सो’च्या बेडीत

>> मंगेश मोरे

अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध ठेवून लग्नाच्या आमिषाने लैंगिक अत्याचार करणारा प्रियकर पोक्सोच्या गुह्यात तुरुंगात गेला. मुस्लिम मुलीने हिंदू तरुणावर प्रेम केले. मात्र आधीच विवाहित असलेल्या प्रियकराच्या गुन्हेगारी वृत्तीमुळे तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. आंधळे प्रेम करून फसलेल्या मुलीच्या भेटीसाठी जन्मदात्रीने उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने मायलेकीची भेट घडवून आणली; परंतु मुलीला आता जन्मदात्री नकोशी झाल्याने आईच्या पदरी निराशा पडली.

पुण्यातील बिबेवाडी परिसरात ऑक्टोबर 2023 मध्ये घडलेले लैंगिक अत्याचाराचे प्रकरणात न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चंडक यांच्या खंडपीठाने पोलिसांच्या उदासीनतेवर ताशेरे ओढल्यानंतर. पुणे पोलीस खडबडून जागे झाले. अल्पवयीन मुलीवर अत्याचार व तिचे अपहरण केल्याच्या आरोपाखाली आशीष ऊर्फ विश्वास राजेंद्र ताकतोडे याला तीन महिन्यांनी अटक केली आणि मुलीची सुटका करून बालकल्याण समितीच्या शिफारशीनुसार डेक्कनच्या महिला सेवाग्राम केंद्रात मुलीची रवानगी केली. यादरम्यान पीडित मुलीच्या आईने अॅड. श्रीपाद हुशिंग यांच्यामार्फत हेबिअस कॉर्पस याचिका दाखल केली होती. खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार पोलिसांनी मुलीला न्यायालयापुढे हजर केले. त्यामुळे आईला चार महिन्यांनी मुलगी पाहता आली.

मातेचा लढा संपला नाही!
न्यायालयाने मुलीला पालकांकडे जाण्याबाबत विचारले. त्यावर तिने आईकडे जाण्यास नकार दिला. मुलगी 17 वर्षांची आहे. तिची इच्छा जाणून घेत खंडपीठाने तिला प्रौढ होईपर्यंत महिला सेवाग्राम केंद्रातच ठेवण्याचे निर्देश दिले आणि आईची याचिका निकाली काढली. मुलीचा ताबा मिळवण्यासाठी याचिकाकर्ती महिला संबंधित प्राधिकरणाकडे दाद मागू शकते, असे खंडपीठाने म्हटले.

प्रकरण काय?

पीडित मुलगी 15 वर्षे 6 महिन्यांची असताना आशीषच्या प्रेमात पडली. यादरम्यान आशीषने बळजबरीने अत्याचार केल्याचे मुलीने आईला सांगितले. तिच्या सांगण्यावरुन आईने 12 ऑक्टोबर 2023 रोजी आशीषविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवला. तसेच मुलीने आशीषशी संबंध तोडण्याचा प्रयत्न केला; मात्र आशीषने तिचा पिच्छा सोडला नाही.

मुलीच्या आईने तक्रार केल्यानंतर दहा दिवसांनी आशीषने मुलीला पळवून नेले. नंतर मुलीच्या आईला दोघे एकत्र असल्याचा पह्टो व्हॉट्सअॅपवर पाठवला आणि धर्मांतर करून लग्न केल्याचे दाखवून तक्रार मागे घेण्यासाठी धमकावले. या प्रकरणात सुरुवातीला पोलीस बेफिकीर राहिले होते. उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर पोलिसांना जाग आली आणि आरोपीला अटक केली.