WC 2023 – आजही धक्का पक्का, इंग्लंड-द. आफ्रिकेची वानखेडेवर जोरदार जुंपणार

>> मंगेश वरवडेकर

मुंबई, दि. 20- वर्ल्ड कपचे सर्वात मोठे दोन धक्के बसलेले दिग्गज आपला धक्का पचवण्यासाठी वानखेडेवर उतरणार आहेत. एक जगज्जेता इंग्लंड आणि दुसरा पहिल्या दोन सामन्यांत सनसनाटी खेळ केल्यानंतर तिसऱया सामन्यात तोंडघशी पडलेला दक्षिण आफ्रिका. वर्ल्ड कपमध्ये खऱया अर्थाने रंग भरणारे हे दोन्ही संघ आजही आपला धक्कादायक खेळ करून सर्वांनाच धक्का देण्यासाठी सज्ज झालेत. उपांत्य फेरीचे स्वप्न पडण्यासाठी दोन्ही संघांना केवळ विजयाचा गोडवा आवश्यक आहे. तो गोडवा कुणाचे तोंड गोड करतोय आणि कुणाचे कडू ते उद्या कळेलच.

दोन्ही संघ वर्ल्ड कपचे मागचे सामने ज्या पद्धतीने हरलेत त्यामुळे दोघांचेही मनोधैर्य खचले आहे. त्या मनाला उभारी देण्याचे काम फक्त आणि फक्त विजयाच्याच हाती आहे. इंग्लंडचा संघ अफगाणिस्तानविरुद्ध ज्या पद्धतीने हरला आहे तो एक त्यांना मानसिक धक्काच होता. जर ते आफ्रिकेविरुद्ध या धक्क्यातून सावरलेत तर बेहत्तर; अन्यथा त्यांना लंडन रिटर्नचे तिकीट आताच काढावे लागेल.

रुट आणि मलान जोरात

ज्यो रुट आणि डेव्हिड मलान हे दोघेच आतापर्यंत समाधानकारक फलंदाजी करू शकले आहेत. रुटने दोन अर्धशतके तर मलानचे शतक हीच काय ते जमेची बाजू. मात्र कर्णधार जोस बटलर, जॉनी बेअरस्टॉ फारसे काही करू शकलेले नाहीत. गोलंदाजीतही त्यांचा एकही गोलंदाज आपला प्रभाव पाडू शकलेला नाही. वानखेडेवर जर त्यांच्या या दोन्ही क्षेत्रांना आपली कमाल दाखवता आली नाही तर त्यांचा पुढचा प्रवास खडतरच नव्हे, तर अशक्य होईल.

वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडचे पारडे जड

उभय संघ वर्ल्डकपमध्ये आजवर आठ वेळा भिडलेत आणि इंग्लंडने पाच सामन्यांत दक्षिण आफ्रिकेवर मात केलीय. सलग तीन वर्ल्ड कप सामन्यांत विजय मिळविल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला गेला दोन वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडकडून हार सहन करावी लागली आहे. आता इंग्लंड विजयाची हॅट्ट्रिक करते की दक्षिण आफ्रिका मालिका खंडित करते ते उद्याच कळेल.

आफ्रिकेचे दिवस फिरले

पहिल्या दोन्ही सामन्यांत शंभर नंबरी विजय मिळवून दक्षिण आफ्रिकेने सनसनाटी निर्माण केली होती. सलामीच्याच सामन्यात श्रीलंकेविरुद्ध 428 धावांचा डोंगर उभारताना त्यांनी आपले वेगळेच रुप समोर आणले होते. श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियावर त्यांनी शंभरपेक्षा अधिक धावांनी विजय नोंदविला होता. पण नेदरलॅण्ड्सविरुद्धच्या त्यांच्या कामगिरीने त्यांना कोमात टाकले आहे. त्यातून बाहेर येण्यासाठी इंग्लंडविरुद्धचा विजय त्यांना नवशक्ती प्रदान करील.

स्टोक्सचे स्ट्रोक लांबणीवरच

खास वर्ल्ड कपसाठी वन डेत पदार्पण करणारा बेन स्टोक्स अद्यापही संघाबाहेरच आहे. जर तो संघाला ताकद देण्यासाठी संघाबरोबर असेल तर त्याची सेवा संघाला कधी मिळणार? जर उद्या इंग्लंड हरला तर त्यांच्यासाठी उपांत्य फेरी प्रवेश कठीण होईल आणि त्यानंतर बेन स्टोक्सच्या खेळण्याला काहीही अर्थ उरणार नाही. त्यामुळे संघाला वाचवण्यासाठी वानखेडेवर स्टोक्सने उतरायला हवे.

वानखेडेवर सातवा सामना

हिंदुस्थानने यजमानपद भूषविलेल्या मागील तिन्ही वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानचा संघ खेळला होता. आजवर हिंदुस्थान मुंबईच्या वानखेडेवर चार सामने खेळला आहे. त्यापैकी दोन 1987 साली, एक 1996 साली आणि एक 2011 साली. तसेच आतापर्यंत सहा सामने खेळले गेले असून यंदा त्यात आणखी पाच सामन्यांची भर पडणार आहे. हिंदुस्थान वगळता अन्य संघांचे केवळ दोनच सामने झाले आहेत. त्यात इंग्लंडचाही समावेश आहे. 1987 साली इंग्लंडने हिंदुस्थानचाच पराभव केला होता.

आजच्या लढाया

नेदरलॅण्ड्स Vs श्रीलंका

वेळ – स. 10.30 वा

 

इंग्लंड Vs . आफ्रिका

वेळ – दु. 2.00 वा.

लाइव्ह – स्टार स्पोर्ट्स, डिज्नी हॉटस्टार