गोदी मीडियावर इंडियाचा बहिष्कार; अर्णब गोस्वामी, सुधीर चौधरीसह 14 अँकरची यादी तयार

वृत्तवाहिन्यांवरील कार्यक्रमातून केंद्रातील सत्ताधारी भाजपचा राजकीय अजेंडा राबविणाऱ्या ‘गोदी मीडिया’पासून दूर राहण्याचा निर्णय ‘इंडिया’ आघाडीने घेतला आहे. उठसूठ मोदींचा उदोउदो करत पक्षपाती करणाऱ्या अर्णब गोस्वामी, सुधीर चौधरींसह  14 अँकरची यादी तयार करण्यात आली आहे. या वादग्रस्त अँकर्सच्या टीव्ही शोवर बहिष्कार टाकण्यात येत असल्याचे इंडिया आघाडीने जाहीर केले आहे.

देश व समाजात फूट पाडण्याचे कार्यक्रम घेणाऱ्या, ठरावीक राजकीय अजेंडा राबविणाऱ्या अँकर्सच्या शोमध्ये सहभागी व्हायचे नाही, असा निर्णय इंडियाच्या समन्वय समितीने घेतला होता. त्यानुसार ‘इंडिया’च्या माध्यम विषय समितीने 14 वादग्रस्त अँकरची यादी आज जाहीर केली.

द्वेषमुक्त भारत हे उद्दिष्ट

दररोज संध्याकाळी 5 वाजता काही टीव्ही चॅनेल्सवर द्वेषाचा बाजार भरवला जातो. अशा स्थितीत, इंडिया आघाडीने ठरवले आहे की, आम्ही द्वेषाच्या बाजारात ग्राहक म्हणून जाणार नाही. ‘द्वेषमुक्त भारत’ हे आमचे उद्दिष्ट आहे. जुडेगा भारत, जितेगा इंडिया! अशी पोस्ट काँग्रेसने केली आहे.

टीव्ही अँकर्सच्या यादीत यांचा समावेश

अदिती त्यागी, अमन चोप्रा, अमिश देवगण, आनंद नरसिम्हा, अर्णब गोस्वामी, अशोक श्रीवास्तव, चित्रा त्रिपाठी, गौरव सावंत, नाविका कुमार, प्राची पाराशर, रुबिका लियाकत, शिव आरूर, सुधीर चौधरी आणि सुशांत सिन्हा.