राजस्थान रॉयल्सला विक्रमाची संधी; एका मोसमात सर्वाधिक विजयांच्या समीप राजस्थान

आयपीएलचा 17 वा मोसम आता चांगलाच बहरला आहे. या मोसमात राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन संघांनी सर्वात लक्षवेधी कामगिरी करताना अवघ्या क्रिकेट विश्वाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. हैदराबादचा खेळ पाहून ते लवकरच 300 पार करतील तर राजस्थानचे विजयी सातत्य पाहता तेसुद्धा 12 वा विजय साकारू शकतात. आयपीएलच्या इतिहासात आजवर एकही संघ 12 विजय नोंदवू शकलेला नाही. यंदा हा विक्रम मोडण्याची राजस्थान रॉयल्सला संधी आहे.

यंदाच्या मोसमात पहिल्या विजयापासून गुणतालिकेत अव्वल स्थानी विराजमान झालेला राजस्थान फेव्हिकॉल का मजबूत जोडप्रमाणे जो चिकटून बसला आहे, तो आता निघण्याची शक्यता कमीच आहे. आतापर्यंत बहुतेक संघ 8 सामने खेळले आहेत आणि काही संघांची विजयाची गाडी 1-2 च्या पुढे सरकलेली नाही. मात्र राजस्थानने एकदा चौकार आणि एकदा विजयाची हॅटट्रिक साजरी करत चक्क 7 विजय मिळवले आहेत. टॉपवर असलेल्या राजस्थानचे प्ले ऑफमध्ये प्रवेश जवळजवळ निश्चित आहे. आता फक्त त्यांना केवळ एक विजय पुरेसा आहे. अजून त्यांचा संघ सहा साखळी सामने खेळणार असून त्यापैकी पाच सामन्यांत ते विजय मिळवत 12 विजयांचा आकडा गाठू शकतात. हे आव्हान कठीण असले तरी राजस्थानसाठी हे जास्त सोप्पे वाटू शकते.

राजस्थानने 2008 सालच्या पहिल्या आयपीएलमध्ये धमाका करताना 14 पैकी 11 सामने जिंकून पराक्रम केला होता. त्यानंतर आणखी 15 आयपीएल झाल्या, पण एकाही संघाला अद्याप विजयाचा आकडा 12 वर घेऊन जाता आलेला नाही. राजस्थानने आपली सर्वोत्तम कामगिरीसुद्धा 2008 सालीच केली होती आणि त्याच स्पर्धेत ते अजिंक्यसुद्धा ठरले होते. त्यानंतर गेली 15 वर्षे त्यांची झोळी रिकामीच राहिलेली आहे. आयपीएलच्या इतिहासात दिल्ली (2012), चेन्नई आणि मुंबई (2013) आणि पंजाब (2014) यांनाच एका मोसमात 11 विजय नोंदविता आले आहेत. विशेष म्हणजे गेल्या 9 मोसमात एकाही संघाला या विक्रमाची बरोबरी साधता आलेली नाही. मात्र यावेळी राजस्थान हाच एकमेव संघ आहे जो या विक्रमाची बरोबरीही साधू शकतो आणि हा विक्रम मोडूही शकतो. फक्त त्यांचे विजयाचे सातत्य असेच कायम राहायला हवे.

सलग विजयांचा विक्रमही राजस्थानच्या दृष्टिक्षेपात

आयपीएलमध्ये सलग 10 विजयांचा विक्रम गेली नऊ वर्षे कोलकात्याच्या नावावर अबाधित आहे. त्यांनी 2014 आणि 2015 च्या मोसमात जेतेपद पटकावताना हा विक्रम रचला होता. तसेच पंजाबनेही 2013-14 च्या मोसमात सलग 8 विजय नोंदवले होते. मात्र एका मोसमातील सलग 7 विजयांचा विक्रम चेन्नई (2013) आणि बंगळुरू (2011) यांनी केला आहे. गेल्या दहा वर्षांत एकाही संघाला एका मोसमात सलग 7 विजय नोंदविता आलेले नाही. राजस्थानची कामगिरी जबरदस्त राहिली तर ते पुढील चार सामन्यांत याची बरोबरी करू शकतात.