हार्दिक पंड्या आणि रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, वाचा सविस्तर

हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा कर्णधारपदाचा वाद आयपीएलमध्ये सर्वात चर्चेचा विषय ठरला आहे. जेव्हापासून हार्दिकला कर्णधार बनवले आहे तेव्हापासून दोघांमध्ये दुरावा दिसला आहे. सोशल मीडियावर काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत ते पाहून दोघांमधील दुरावा स्पष्ट दिसत आहे. याचा सगळ्यात जास्त परिणाम त्याच्या संघावर होताना दिसत आहे. मुंबई इंडियन्सचा सलग तिसऱ्यांदा पराभव झाला असून संघ गुणतालिकेत सगळ्यात शेवटच्या स्थानावर आहे.

पण यानंतरही मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एमआयटीव्हीने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये हार्दिक पंड्या आणि रोहित शर्मा दोघांमधील दुरावा संपलेला दिसत आहे. जर असे झाले तर मुंबईच्या खेळीत सुधार दिसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अनेकदा खेळाडूंचा मानसिक आणि शारीरिक थकवा दूर करण्यासाठी त्यांना गेट अवे ब्रेक दिला जातो. त्यावेळी संघातील खेळाडू एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसतात. अशावेळी खेळाडूंमध्ये मैत्रीपूर्ण नातेही वाढते. मुंबई इंडियन्सनेही आपल्या खेळाडूंना तो ब्रेक दिला आहे. एमआयटीव्हीवर रिलीज झालेल्या एका व्हिडीओमध्ये रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या हात मिळवताना आणि गप्पा मारताना दिसले आहेत.

मुंबई इंडियन्सकडून शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये हार्दिक पंड्या ईशान किशनची गळाभेट घेताना दिसत आहे. तसेच हार्दिक, बुमराह आणि ईशान कमर्शियल शूट दरम्यान एकत्र दिसले. जिथे ईशान मजामस्ती करताना दिसत आहे. त्यानंतर मुंबईची संपूर्ण टीम अॅडव्हेंचर ट्रीप करताना दिसली. या सहलीत ॲक्वा ॲडव्हेंचरचा आनंद घेतल्यानंतर सायंकाळी संगीताचाही आनंद लुटताना दिसत आहेत.

गेट अवे ब्रेक दरम्यान, मुंबईचे खेळाडू एकमेकांसोबत अगदी निवांत तसेच मजामस्ती करताना दिसले. मुंबईच्या चाहत्यांसाठी ही मोठी दिलासादायक बाब आहे. खरेच खेळाडूंमध्ये पुन्हा बॉन्डिंग निर्माण झाले, तर येत्या सामन्यांमध्ये संघाच्या कामगिरीत सुधारणा दिसून येईल. मुंबई सध्या गुणतालिकेवर सर्वात खालच्या स्थानावर आहे. पण याआधीही, एका पर्वात पहिले तीन किंवा त्याहून अधिक सामने गमावूनही संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्यात यशस्वी झाला आहे.

2015 च्या आयपीएल पर्वात, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली, मुंबई इंडियन्सने त्यांचे पहिले 4 सामने गमावले होते. त्यानंतर संघाने पुनरागमन केले आणि केवळ प्लेऑफसाठी पात्रच नाही तर ट्रॉफीही उंचावली. तसेच सूर्यकुमार यादवही संघात पुनरागमन करत आहे. यामुळे संघाची मधली फळी आणखी मजबूत होईल.