हमासच्या दीड हजार दहशतवाद्यांचा खात्मा, चार दिवसांत एकूण 1600 जणांचा मृत्यू; धुमश्चक्री सुरूच

पॅलेस्टाईनमधील गाझापट्टीत गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेली रक्तरंजित धुमश्चक्री आज चौथ्या दिवशीही कायम होती. दोन्ही बाजूने रॉकेट्स, गोळीबार सुरू असून मंगळवारी इस्रायलने हमासच्या तब्बल दीड हजार दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि गाझाच्या सीमेवर पूर्णपणे ताबा मिळवला. यात इस्रायलचे 123 सैनिक ठार झाले. सगळीकडे विध्वंसच दिसत असून अडकून पडलेल्या कुटुंबीयांचे तसेच आप्त गमावलेल्यांचे आक्रोश सुरू आहेत. युद्धात आतापर्यंत एकूण 1600 जणांचा मृत्यू झाला असून या कठीण प्रसंगात हिंदुस्थान इस्रायलच्या पाठीशी असल्याचे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

आज चौथ्या दिवशी इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला. नेतन्याहू यांनी तेथील इत्थंभूत परिस्थितीची माहिती मोदी यांना दिली. त्यानंतर मोदी यांनी हिंदुस्थान पूर्णपणे इस्रायलच्या पाठीशी असल्याचे ट्विट केले. इस्रायलच्या सैन्याने गाझापट्टीतील हमासच्या 200 तळांवर रॉकेट्स डागले. या हल्ल्यांमध्ये दीड हजार दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचा दावा इस्रायलने केला आहे.

150 ओलिसांना ठार मारण्याची धमकी

हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांमध्ये थायलंडच्या 18 नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेकजण बेपत्ता आहेत. सोमवारी इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी कुठल्याही परिस्थितीत गाझावर नियंत्रण मिळवण्याचे आदेश दिल्यानंतर सैन्याने आक्रमक पवित्रा घेत रात्रभर गाझापट्टीवर हल्ले केले. हे हल्ले थांबवले नाहीत तर इस्रायलच्या 150 ओलीस ठेवलेल्या नागरिकांची हत्या करण्याची धमकी हमासने दिली आहे.

टीसीएसचे कर्मचारी अडकले

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही आयटी कंपनीही इस्रायल-हमास युद्धावर लक्ष ठेवून आहे. कंपनी एचआर अधिकाऱ्यांच्या संपका&त आहे. मात्र कंपनीने तेथे काम करणाऱ्या हिंदुस्थानी टीसीएस कर्मचाऱ्यांची संख्या उघड केलेली नाही.
गाझापट्टीत हमासच्या तब्बल 1,707 तळांवर इस्रायलच्या सैन्याने हल्ले चढवले. यात 475 रॉकेट सेंटर्स, 23 स्ट्रटेजिक साइट्स आणि 22 अंडरग्राऊंड तळांचा समावेश आहे.

युद्ध आम्हीच संपवणार

हमासने इस्रायलवर हल्ला करण्याची खूप मोठी चूक केली असून हमास आणि इस्रायलच्या दुश्मनांना असा धडा शिकवू की, त्यांच्या दहा पिढय़ा लक्षात ठेवतील, असा इशारा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू यांनी दिला आहे. तसेच आम्हीच हे युद्ध संपवणार, अशी घोषणाही केली आहे. आम्हाला युद्ध नको आहे, पण अतिशय क्रूरपणे हे युद्ध आमच्यावर लादण्यात आल्याचे ते म्हणाले.

पाच देशांचे इस्रायलला समर्थन

इस्रायल-हमास युद्धात अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि ब्रिटन या पाच देशांनी इस्रायलला समर्थन जाहीर केले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी लंडनच्या उत्तरेकडील यहुदी प्रार्थनास्थळ येथे यहुदी समुदायाच्या सुरक्षिततेबाबत आश्वस्त केले. सुनक यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅनुएल मॅन्क्रो, जर्मनीचे चान्सलर ओलाफ शोल्ड आणि इटलीचे पंतप्रधान जियोर्जिया मेलोनी यांच्याशी चर्चा करून जारी केलेल्या संयुक्त निवेदनात हमासच्या हल्ल्याविरोधात एकजुटीने उभे राहण्याचा दृढनिश्चय केला.

हमासची चर्चेची तयारी

हमासविरोधात इस्रायलचे सैन्य आक्रमक झाल्यानंतर आणि तीन लाखांहून अधिक सैन्य युद्धात उतरवल्यानंतर हमासने चर्चेची तयारी दर्शवली आहे. गाझापट्टीतील वीज, अन्नधान्य आणि इंधन पुरवठा तोडल्यानंतर हमासने इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासमोर चर्चेचा प्रस्ताव ठेवला आहे. आम्ही आमचे लक्ष्य प्राप्त केले असून युद्धविरामासाठी इस्रायलसोबत चर्चेसाठी तयार आहोत, असे हमासचा नेता अबू मुसा मरझुक याने म्हटले आहे. दरम्यान, 1 लाख 80 हजार पॅलेस्टिनींनी संयुक्त राष्ट्राच्या निवारा छावण्यांमध्ये आसरा घेतला. युद्धात एकूण 1,665 नागरिकांचा मृत्यू झाला. यात 900 इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला असून 2 हजार 300 जण जखमी झाले. अमेरिकेच्या 11 नागरिकांचा, तर ब्रिटनच्या 10 नागरिकांचा मृत्यू झाला.