पॅलेस्टाइन राष्ट्रपतींवर जीवघेणा हल्ला; अंदाधुंद गोळीबारात सुरक्षा रक्षकाचा मृत्यू

पॅलेस्टाईनचे राष्ट्रपती महमूद अब्बास यांच्या ताफ्यावर बुधवारी अंदाधुंद गोळीबार करीत त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या हल्ल्यात ते बालबाल बचावले, परंतु सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याची जबाबदारी ‘सन्स ऑफ अबू जंदाल’ या संघटनेने घेतली आहे.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांची भेट घेतल्यानंतर महमूद अब्बास यांनी गाझावरील हल्ले रोखले जावे, असे विधान केले होते. राष्ट्रपती अब्बास यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आल्याने गाझापट्टीत मोठी दहशत निर्माण झाली आहे. वेस्ट बँकेमधील सन्स ऑफ अबू जंदाल या संघटनेने राष्ट्रपती महमूद अब्बास यांना इस्रायलविरुद्ध कारवाई करण्यासाठी 24 तासांचा अल्टिमेटम दिला होता. अल्टिमेटमची डेडलाईन संपताच मंगळवारी त्यांच्या ताफ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. सन्स ऑफ अबू जंदाल संघटनेची मागणी होती की, राष्ट्रपती अब्बास यांनी इस्रायलविरुद्ध 24 तासांत युद्धाची घोषणा करायला हवी होती, परंतु तसे न झाल्याने गोळीबार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

मृतांची संख्या 10 हजारांवर
गाझातील मृतांची संख्या आता दहा हजारांवर पोहोचली आहे. यात आतापर्यंत गाझातील दहा हजार लोकांचा मृत्यू झाला असून मृतांत 4100 हून जास्त छोटय़ा मुलांचा समावेश आहे.

अमेरिकेने इस्रायलला सुनावले
इस्रायलने गाझा पट्टी पुन्हा व्यापू नये, असे वक्तव्य टोकियो येथील जी 7 गटाच्या परिषदेनंतर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी केले आहे. हमासने केलेल्या रानटी हल्ल्यानंतर तिथे पुन्हा पहिल्यासारखी परिस्थिती अशक्य आहे याबद्दल अमेरिका आणि इस्रायलचे एकमत आहे. आपल्या सर्वांचीच गाझातील संघर्ष शक्य तितका लवकर संपून नागरिकांच्या यातना कमी व्हाव्यात अशी इच्छाही आहे; पण गाझात भविष्यातील शांततेसाठी तेथील पॅलेस्टाइनींचे युद्धानंतर किंवा आताही सक्तीने विस्थापन होऊ नये या महत्त्वाच्या बाबीचा अंतर्भाव गरजेचा आहे, असे त्यांनी सांगितले.

दहशतवादी हल्ल्याचा व्हिडीओ आला समोर
राष्ट्रपती महमूद अब्बास यांच्या ताफ्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. ‘सन्स ऑफ अबू जंदाल’ संघटनेचे बंदूकधारी राष्ट्रपतींच्या ताफ्यावर अंदाधुंद गोळीबार करीत आहेत. या हल्ल्यात काही बंदूकधारी उभे असलेले दिसत आहेत. हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात अब्बास यांचा सुरक्षा रक्षक गोळी लागून मृत्युमुखी पडला.