इस्रायलचा वॉर प्लॅन ठरला; तीन टप्प्यांत हल्ला, युद्ध आणखी चिघळणार; मुस्लिम राष्ट्रांमध्ये प्रचंड नाराजी

गाझा पट्टीवर नियंत्रण मिळवणार नाही, पॅलेस्टिनींचे अस्तित्व पुसून टाकणार नाही, मात्र हमासला मुळासकट उपटून टाकण्यासाठी तीन टप्प्यांत हल्ला करणार, असे इस्रायलचे संरक्षत्रण मंत्री योहाव गॅलेंट्स यांनी म्हटले आहे. इस्रायलने आज 14 व्या दिवशीही गाझा पट्टीवर हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये अनेक इमारतींचे प्रचंड नुकसान झाले. रोजच्या ब्रेडसाठी रांगेत उभ्या राहिलेल्या सर्वसामांन्यांवरही हल्ले झाल्याचा दावा पॅलेस्टिनी मंत्रालयाने केला असून मुस्लिम राष्ट्रांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे हे युद्ध आणखी चिघळणार असल्याचे चित्र आहे.

  • या संघर्षात आतापर्यंत 5 हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून साडेबारा हजारांहून अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.
  • हमासने 206 नागरिकांना ओलीस ठेवले आहे. यात इस्रायलसह इतर देशांच्या नागरिकांचाही समावेश आहे.
  • मुस्लिम राष्ट्रांमध्ये इस्रायलच्या हल्ल्यांविरोधात सातत्याने निदर्शने होत असून इस्रायलने मोरोक्को, जॉर्डन आणि बहरीन येथून आपल्या राजनैतिक अधिकाऱ्यांना सुरक्षित इस्रायलमध्ये हलवले आहे.
  • गाझा पट्टीतील सर्वात मोठे हॉस्पिटल नासर हे रुग्णांनी भरून वाहत आहे. पाणी, औषध साठा, इंधनाचा प्रचंड तुटवडा जाणवत असल्याचे चित्र आहे.
  • सोशल मीडियावर चिथावणीखोर किंवा अवैध व्हीडियो, मजकूर प्रसिद्ध होणार नाही याची काळजी घेण्याचे युरोपीयन संघाचे मेटा, टीकटॉकला आवाहन.

इस्रायलचा नवा दुश्मन हुतीदेखील मैदानात

गाझा पट्टीवर इस्रायलकडून सातत्याने हवाई हल्ले होत आहेत. मात्र, आता इस्रायलसमोर आणखी एका दहशतवादी संघटनेचे आव्हान आहे. हुती या दहशतवादी संघटनेनेही इस्रायलवर हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. तर एका बाजूने लेबनॉन बॉर्डरवर हिजबुल्लाहकडून सातत्याने हल्ले होत आहेत. त्यामुळे हमास, हिजबुल्लाह आणि हुती या तिन्ही दहशतवादी संघटनांशी इस्रायलला तीन आघाडय़ांवर संघर्ष करावा लागत आहे.

इस्रायलींना व्हीसाशिवाय अमेरिकेत परवानगी

इस्रायल-हमास युद्ध पेटत चालल्याच्या पार्श्वभूमीवर इस्रायली नागरिकांना अमेरिकेत व्हीसाशिवाय 90 दिवस राहण्याची परवानगी देण्याची घोषणा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केली. दरम्यान, बायडेन यांनी याबाबतची घोषणा करताच हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलमधील दक्षिणेकडील भागात रॉकेट्स डागले.

असे असतील इस्रायलचे हल्ल्याचे टप्पे

  1. पहिल्या टप्प्यात हवाई हल्ले करण्यात येतील. हमासचे तळ उद्ध्वस्त करण्यावर इस्रायलचा भर असेल.
  2. दुसऱ्या टप्प्यात जमिनीवरून रॉकेट्स तसेच तोफांच्या माध्यमातून हल्ले करण्यात येतील.
  3. तिसऱ्या टप्प्यात इस्रायलमध्ये घुसून हमासच्या तळांवर थेट हल्ले करण्यात येणार असल्याचे संरक्षणमंत्री गलेंट यांनी म्हटले आहे.