नितीन गडकरी धमकी प्रकरण – लश्कर-ए-तोएबाचा दहशतवादी निघाला मास्टरमाईंड, तुरुंगातूनच कट रचल्याचे उघड

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना खंडणीसाठी धमकीचे दोन फोनकॉल आले होते. जानेवारी ते मार्च 2023मध्ये हा प्रकार घडला होता. आता या खंडणी प्रकरणामागील मास्टरमाईंडचे नाव उघड झाले आहे. बेळगावच्या तुरुंगामध्ये कैद असलेला लश्कर-ए-तोएबाचा (Lashkar-eTaiba) दहशतवादी यामागील सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. अफसर पाशा (Afsar Pasha) असे या दहशतवाद्याचे नाव आहे.

अफसर पाशा याचा साथीदार जयेश कंथा उर्फ जयेश पुजारी (Jayesh Kantha, alias Jayesh Pujari) याने 14 जानेवारी आणि 21 मार्च रोजी गडकरी यांच्या कार्यालयात फोन करून खंडणी मागितली होती. त्याने पहिल्यांदा 100 कोटी तर दुसऱ्या वेळी 10 कोटी रुपये खंडणी म्हणून मागितले होते. पैसे न दिल्यास गडकरींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. अफसर पाशा याच्या सांगण्यावरून त्याने हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

अफसर पाशा हा प्रतिबंधित पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा माजी राष्ट्रीव सचिव असून बॉम्ब बनवण्यात तो माहिर आहे. तसेच आत्मघातकी हल्ले आणि त्यांची अंमलबजावणी करण्याचे प्रशिक्षणही त्याने घेतलेले आहे. त्याच्यावर ढाका येथे 2003 आणि बंगळुरु येथे 2008मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप आहे. तो सध्या बेळगावच्या तुरुंगामध्ये बंद आहे.

तुरुंगात असतानाच त्याने जयेश पुजारी याला गळाला लावून गडकरी यांच्या कार्यालयात फोन करून खंडणीची मागणी करण्यास सांगितले होते. मात्र खंडणीच्या रकमेवरून पाशा आणि पुजारी यांच्यात वादही झाले. पुढे हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पुजारी याला मार्चमध्ये नागपुरात आणण्यात आले. त्याला सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात (Nagpur central jail) ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, गडकरींच्या खंडणी प्रकरणामागील सूत्रधार अफसर पाशा असल्याचे समोर आल्यानंतर त्याला चौकशीसाठी महाराष्ट्रात आणण्यासाठी पोलिसांचे पथक कर्नाटकला जाणार आहे. खंडीणीचे प्रकरण समोर आल्यानंतर कारागृहामध्ये पुजारीच्या ताब्यातून मोबाईल आणि सिमकार्ड जप्त करण्यात आले होते. आता पाशाला ठेवण्यात येणाऱ्या कोठडीचीही तपासणी होण्याची शक्यता आहे.