जयपूर एक्सप्रेस गोळीबार प्रकरण; चेतन सिंहविरोधात खटला चालणार

जयपूर-मुंबई एक्सप्रेस गोळीबार प्रकरणातील आरोपी बडतर्फ आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंहविरुद्ध 20 जानेवारीपासून खटला चालणार आहे. दिंडोशी सत्र न्यायालयाने मंगळवारी खटला चालवण्याची तयारी दर्शवत साक्षीदारांना समन्स बजावले. तसेच साक्षीदारांना हजर करण्यासाठी पोलीस आणि सरकारी पक्षाला निर्देश दिले.

मूळचा उत्तर प्रदेशच्या हाथरस येथील रहिवाशी असलेल्या चेतन सिंहची अलिकडेच आरपीएफच्या मुंबई विभागात नेमणूक करण्यात आली होती. त्याने डय़ुटीवर असताना 31 जुलैच्या मध्यरात्री जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये अंदाधुंद गोळीबार केल्याचा आरोप आहे. या घटनेत चार प्रवाशांचा मृत्यू झाल्याने चेतनविरुद्ध हत्येच्या आरोपाखाली खटला चालणार आहे. त्याने गेल्या काही वर्षांपासून मानसिक आजाराने त्रस्त असल्याचे कारण देत जामिनासाठी दाद मागितली होती. मात्र न्यायालयाने जामीन फेटाळला. त्यानंतर मंगळवारी न्यायाधीश ए.झेड. खान यांनी 20 जानेवारीपासून चेतन सिंहविरुद्ध खटला चालवण्याची तयारी दर्शवली. सुनावणी वेळी चेतनतर्फे अॅड. सुरेंद्र लांडगे आणि अॅड. अमित मिश्रा यांनी बाजू मांडली. याच वेळी न्यायालयाने खटला चालवण्यासाठी साक्षीदारांना समन्स बजावले.

 जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये अंदाधुंद गोळीबार केल्यानंतर चेतन सिंह पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. त्याचदरम्यान पाठलाग करून त्याला मीरा रोड परिसरातून अटक केली होती. तो सध्या न्यायालयीन कोठडीत असून सुरक्षेच्या कारणास्तव त्याला अकोला तुरुंगात ठेवले आहे.