अनंतनागमध्ये कुख्यात दहशतवादी उझैर खानचा खात्मा, सर्च ऑपरेशन अद्याप सुरूच

जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये सुरू असलेल्या चकमकीत हिंदुस्थानी सैनिकांना मोठे यश मिळाले आहे. सैन्याच्या जवानांनी लश्कर-ए-तैयबाचा दहशतवादी उझैर खान याचा खात्मा केला आहे. काश्मीरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी याबाबत माहिती देताना म्हटले की, अनंतनागमध्ये दहशतवादी उझैर मारला गेला आहे. उझैर हा लश्कर-ए-तैयबाचा कमांडर होता. उझैरचा मृतदेह सापडला असून अजून एका मृतदेहाचा शोध सध्या सुरू आहे. हा मृतदेह तिसऱ्या दहशतवाद्याचा असू शकतो. उजैरचा खात्मा झाला असला तरी सर्च ऑपरेशन सुरू राहील अशी माहितीही त्यांनी दिली आहे. या भागात काही स्फोटके पेरली असल्याचा संशय असल्याने हे सर्च ऑपरेशन सुरू ठेवण्यात येणार आहे.

जम्मू कश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील कोकेरनाग येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीदरम्यान बेपत्ता झालेल्या जवानाचा मृतदेह पाच दिवसांनी सापडला आहे. प्रदीप सिंह हा 27 वर्षांचा लष्करातील जवान 13 सप्टेंबरपासून बेपत्ता होता. सोमवारी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह सापडला आहे. त्यामुळे अनंतनाग येथील चकमकीत शहीद झालेल्या जवानांची संख्या 4 झाली आहे. कोकेरनाग येथे दहशतवाद्यांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेत प्रदीप सिंग सहभागी होते. जम्मू कश्मीरमध्ये मंगळवारीही लष्कराची शोधमोहीम सुरू आहे. अनंतनागमध्ये सुरू असलेली चकमक संपली असून सैनिकांनी शोध मोहिमेवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. दहशतवाद्यांकडे असलेल्या गोष्टी या मोहिमेत सापडण्याची शक्यता असून त्यांनी स्फोटके पेरली असल्याचाही संशय आहे. ही स्फोटके शोधून ती निकामी करावी लागतील. हिंदुस्थानी जवानांनी केलेल्या कारवाईत दोन दहशतवादी ठार झाले असून चार जवान शहीद झाले आहेत. तिसऱ्या दहशतवाद्याच्या मृतदेहाचा सध्या शोध घेण्याचे काम सुरू आहे.