उमदी आश्रमशाळेतील 134 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

जत तालुक्यातील उमदी येथील समता अनुदानित आश्रमशाळेतील जवळपास 134 विद्यार्थ्यांना रविवारी रात्री उशिरा अन्नातून विषबाधा झाली. सर्व विद्यार्थ्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालय, माडग्याळ व जत येथे उपचारांसाठी हलविण्यात आले. विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून, खबरदारीचा उपाय म्हणून 20 विद्यार्थ्यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणाखाली आहे.

विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. माडग्याळ, जत व मिरज या तिन्ही ठिकाणच्या डॉक्टरांना सर्वोत्तम उपचार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या उपचारांत कोणतीही उणीव ठेवू नये, अशा सूचना त्यांनी मेडिकल कॉलेजची यंत्रणा व जिल्हा शल्यचिकित्सकांना दिल्या आहेत. तसेच या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.