गोळीबार करणाऱया जवानाला 7 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी 

जयपूर-मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये अंदाधुंद गोळीबार करणाऱया आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंहला मंगळवारी बोरिवलीतील महानगर दंडाधिकारी न्यायालयापुढे हजर केले होते. धावत्या एक्स्प्रेसमध्ये केलेला गोळीबार हा गंभीर गुन्हा आहे, असा युक्तिवाद करून सरकारी वकिलांनी आरोपी सिंहला सात दिवसांची कोठडी सुनावण्याची विनंती केली. ही विनंती मान्य करीत न्यायालयाने सिंहला 7 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

सोमवारी पहाटे धावत्या एक्प्रेसमध्ये कॉन्स्टेबल चेतन सिंहने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात आरपीएफमधील सहाय्यक उपनिरीक्षकासह चौघांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गाडीतून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱया सिंहला मीरा रोड येथून अटक करण्यात आली होती. मंगळवारी त्याला बोरिवली येथील महानगर दंडाधिकारी शिवदत्त मलिकार्जुन पाटील यांच्यापुढे हजर करण्यात आले होते. यावेळी सरकारी पक्षाने सिंहच्या अधिक चौकशीसाठी त्याला सात दिवस पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाला केली. आरोपी हा सरकारी अधिकारी आहे. त्याने रेल्वे प्रवाशांचे रक्षण करणे अपेक्षित होते. असे असताना त्याने केलेला गोळीबार गंभीर गुन्हा आहे. या घटनेची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे, असा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला. त्याची दखल घेत दंडाधिकाऱयांनी आरोपी सिंहची 7 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली.