ते नेहमीच खरे आणि योग्य बोलतात, ‘त्या’ व्हिडीओवरून जयंत पाटलांचा अजितदादांना टोला

अजित पवारांसह काही आमदार सत्तेमध्ये सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले. दोन्ही गटांनी आपलाच पक्ष खरा असल्याचा दावा निवडणूक आयोगाकडे केला आहे. याबाबत 6 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीआधी अजित पवार यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजितदादांना टोला लगावला आहे.

शिवसेनेमध्ये बंडखोरी झाली तेव्हा अजित पवार यांनी एक विधान केले होते. यात ते शिवसेनेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब ठाकरे असून पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरेंनाच मिळायला हवे. 40 आमदार आणि काही खासदार एका बाजूला गेले म्हणून तिकडे आम्ही पक्ष आणि चिन्ह दिले. मग एखाद्या पक्षाचे एक किंवा दोन आमदार असतील. ते एका बाजूने गेले, आता मनसेचे उदाहरण घ्या. मनसेचा एक आमदार आहे. तो म्हणाला इंजिनही माझे, पक्षही माझा तर मग तुम्ही तसाच निर्णय देणार का? असा सवाल करताना दिसतात. हा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक आयोगाकडे देणार का? असा सवाल जयंत पाटील यांना विचारण्यात आला.

माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना पाटील म्हणाले की, निवडणूक आयोगासमोर काय मांडायचे हे मी पहात नाही. त्यामुळे आमचे वकील काय ठरवणार याची मला कल्पना नाही. त्या व्हिडीओमध्ये अजित पवार सांगताहेत की मनसेचा एक आमदार गेला तकर सर्व त्याच्याकडे जाईल का? ते नेहमीच खरे बोलतात, योग्य बोलतात. मला वाटते त्यांची ही भूमिका निवडणूक आयोगाने उशीरा की होईन लक्षात घ्यावी.

ते पुढे म्हणाले की, पक्षाच्या संस्थापक अध्यक्षांना बाजुला करण्याचा निर्णय काही लोकं कुठेतरी बसून घेतात आणि पाच-सहा दिवस याची वाच्यता होत नाही. बाहेर तेच अध्यक्ष आहेत असे सांगितले जाते. पक्ष आमच्याच ताब्यात असल्याचा आदिर्भाव कोणी मांडत असेल तर या देशात राजकीय पक्ष पळवण्याची किंबहुणा चोरण्याची नवीन पद्धत सुरू झाल्याचे दिसतेय. निवडणूक आयोग्य याबाबत योग्य निर्णय घेईल, असा आम्हाला विश्वास असल्याचेही ते म्हणाले.

आमदार गेले म्हणजे पक्ष त्यांच्या मागे जातो हे चित्र जर देशात तयार झाले तर देशातील कोणताही राजकीय व्यक्ती स्वत:चा पक्ष काढण्याच्या फंदात पडणार नाही. आमदारच जाणार असतील तर काय? त्यामुळे अनेक प्रश्नांची उत्तरे 6 तारखेच्या सुनावणीमध्ये समोर येतील. एका सुनावणीमध्ये हे प्रकरण संपेल असे मला वाटत नाही. योग्य निर्णय घेण्यासाठी निवडणूक आयोगाला घाई नसावी. प्रतिज्ञापत्र आलेले आहेत, ते तपासण्यापासून ते बऱ्याच गोष्टी आहेत. त्या सर्व त्यांच्यासमोर मांडण्यात येतील, असेही पाटील म्हणाले.