राष्ट्रवादीत फूट नसूनही सुनावणी लावली, जयंत पाटील यांचा निवडणूक आयोगावर आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणत्याही – प्रकारची फूट पडलेली नाही, असे आम्ही निवडणूक आयोगाला कळविले होते. तरीही पक्षात फूट पडल्याचे गृहीत धरून ६ ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाने सुनावणी ठेवल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.

राष्ट्रवादीचे अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांनी भाजपशी घरोबा करून सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांनी बहुसंख्य आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा करून पक्ष आणि चिन्हावर दावा केला. तर, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षात कोणतीही फूट पडली नसल्याचे सांगून, काही आमदारांनी पक्षाच्या धोरणाच्या विरोधात निर्णय घेतल्याचे सांगितले.

राष्ट्रवादीचे प्रकरण निवडणूक आयोगासमोर असून, शरद पवार यांनी पक्षात फूट पडली नसल्याचे कळविले आहे. असे असतानाही पक्षात फूट पडल्याचे गृहीत धरून निवडणूक आयोगाने ६ ऑक्टोबर रोजी सुनावणी ठेवल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.