अनेक वकील जजमेंट लिहून जातात आणि तोच निकाल कोर्ट देते, मुख्यमंत्री गेहलोत यांचा गंभीर आरोप

ज्युडिशिअरीमध्ये (न्याय संस्था) प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. लोअर ज्युडिशिअरी असो की वरिष्ठ, परिस्थिती  गंभीर आहे, असा थेट आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे. मी तर असेही ऐकलं आहे की, अनेक वकील तर जजमेंट (निकालपत्र) लिहून जातात आणि तोच निकाल कोर्टातून येतो, असा गौप्यस्पह्टही त्यांनी केला.

विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि राजस्थान भाजप आमदार पैलास मेघवाल यांनी पेंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. सक्रिय राजकारणात येण्यापूर्वी अर्जुन राम मेघवाल हे सनदी अधिकारी होते तेव्हा त्यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला, असे पैलास मेघवाल यांनी म्हटले आहे. या आरोपांबाबत पत्रकारांनी विचारले असता मुख्यमंत्री गेहलोत म्हणाले, पैलास मेघवाल यांनी केलेले आरोप खरे आहेत. अर्जुन राम मेघवाल यांच्या काळात मोठा भ्रष्टाचार झाल्याची माहिती मला मिळाली आहे. मात्र हा भ्रष्टाचार त्यांनी दाबून टाकला. उच्च न्यायालयातून स्टे मिळाला आहे. या आरोपांची आता राज्य सरकार चौकशी करणार आहे.

आज देशातील स्थिती खूपच गंभीर आहे. न्याय संस्थेत प्रचंड भ्रष्टाचार सुरू असून अनेक वकील तर स्वतःच जजमेंट लिहून जातात आणि कोर्टातून तोच निकाल येतो, असेही मी एकले आहे. यावर देशवासीयांनीच विचार केला पाहिजे.

जेथे न्याय संस्था दबावाखाली,तिथे ईडी-सीबीआय काय करणार?

ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सचे अधिकारी कधीही, कोणाच्याही घरी घुसतात, धमक्या देतात. 15 मिनिटांत येतोय आपला मोबाईल नीट ठेवा, असं सांगतात. जेथे न्याय संस्था दबावाखाली आहे तिथे ईडी-सीबीआयचे लोक काय करणार? मात्र अशा घटनांमुळे देश बरबाद होत आहे, असे गेहलोत यांनी सांगितले. या तपास यंत्रणांचा आम्ही सन्मान करतो. देशासाठी या यंत्रणा आवश्यक आहेत. पण त्या दबावाखाली काम करीत आहेत, असे ते म्हणाले.

भाजप, संघाचे चालचरित्र,चेहरा कुठे गेला?

भाजपचे लोक चालचरित्र, चेहऱयाच्या गप्पा मारत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही वेगळ्या विचारांची संघटना असल्याचे सांगायचे. मात्र आता त्यांचे चालचरित्र, चेहरा कुठे गेला, असा सवाल गेहलोत यांनी केला.