बेस्टमध्ये हातसफाई; 75 मोबाईल हस्तगत

कांदिवली, मालाड, मालवणी येथे बसने प्रवास करणाऱया प्रवाशांचे मोबाईल लांबवणाऱ्या टोळीच्या कांदिवली पोलिसांनी मुसक्या आवळल्या. सलीम शेख, अल्ताफ रूपानी, शाहाब खान, रमजान लांजेकर, हमीद खान अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी 75 चोरीचे मोबाईल हस्तगत केले आहेत. सलीम आणि शाहाबविरोधात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. नशेसाठी पैसे हवे असल्याने ते चोऱया करत असल्याचे तपासात समोर आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून कांदिवली, मालाड, मालवणी येथे बेस्ट बसने प्रवास करणाऱया प्रवाशांचे मोबाईल चोरी होत असल्याच्या घटना घडत होत्या. गेल्या आठवडय़ात मालवणी ते कांदिवली असा प्रवास करणाऱया एका प्रवाशाचा मोबाईल चोरीला गेला होता. चोरी प्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. सहाय्यक आयुक्त शैलेंद्र धिवार यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक संदीप विश्वासराव यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक सोहम कदम, हेमंत गीते, उपनिरीक्षक इंद्रजित भिसे आदींच्या पथकाने तपास सुरू केला. कदम, गीते आणि भिसे यांच्या पथकाने रूट क्रमांक 244, 207 या मार्गावर सतत पाळत ठेवली. सकाळी 7 ते 11 आणि सायंकाळी 4 ते 6 या वेळात पोलिसांनी तेथे फिल्डिंग लावली. पोलिसांनी फिल्डिंग लावून अल्ताफ आणि सलीमला पकडले. तर हमीद पळून गेला. त्याला पोलिसांनी मालवणी परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्या चौकशी रमजान आणि शाहाबचे नाव समोर आले. त्या दोघांनादेखील पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 7 लाख 35 हजार 600 रुपयांचे मोबाईल हस्तगत केले आहेत. त्या पाच जणांना अटक करून न्यायालयात हजर केले. त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

अशी करतात चोरी
सलीम, अल्ताफ, हमीद हे चोऱया करण्यासाठी बाहेर पडतात. गर्दीचा फायदा घेऊन कधी सलीम तर कधी अल्ताफ मोबाईल चोरतो. चोरलेला मोबाईल ते हमीदकडे देतात. त्यानंतर हमीद हा स्टॉप आल्यावर खाली उतरून जातो. ते चोरलेले मोबाईलचा पह्टो ते शाहाबला पाठवतात. त्यानंतर रमजान आणि शाहाब ते चोरीच्या मोबाईलची विक्री करतात. मोबाईलची किंमत ठरवली जाते. कमिशन म्हणून सलीम, अल्ताफ आणि हमीदला 100 ते 200 रुपये मिळतात. त्या पैशातून ते नशा करायचे. ऩत्यांच्याकडून पोलिसांनी 75 मोबाईल हस्तगत केले आहेत.

या मार्गावर करतात चोऱ्या
सलीम, अल्ताफ आणि हमीद हे मालवणी येथे राहतात. चोऱया करण्यासाठी ते सकाळी ते घराबाहेर पडतात. अथर्व कॉलेज, डहाणूकर वाडी सिग्नल अन् कांदिवली देना बँक स्टॉप या मार्गावर प्रवाशांची जास्त गर्दी असते. त्या मार्गावर ही टोळी चोऱया करत असल्याचे तपासात समोर आले आहे. सलीम, अल्ताफ, हमीद हे रेकी करतात. कोणत्या प्रवाशाने शर्टच्या आणि पँटच्या मागील खिशात मोबाईल ठेवला याची रेकी करतात. प्रवाशी बसमध्ये चढताना आणि बसमधून उतरताना त्यांना ते तिघे टार्गेट करून त्याचा मोबाईल लांबवत असायचे.