केडगाव-नेप्ती रस्त्याचे काम जलद गतीने पूर्ण करा, शिवसेनेच्या वतीने ‘रास्ता रोको’ आंदोलन

केडगाव ते नेप्ती बाजार समितीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. संबंधित ठेकेदाराला वर्क ऑर्डर मिळूनही जलदगतीने काम करीत नाही ते काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने नगर-पुणे रस्त्यावर ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. यावेळी मागण्यांचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी मोठय़ा प्रमाणात वाहतूक ठप्प झाली होती.

याप्रसंगी विभागप्रमुख संग्राम कोतकर, डॉ. श्रीकांत चेमटे, गोरक्षनाथ ठुबे, बाबासाहेब शिंदे, संतोष डमाळे, बाबासाहेब मोढवे, दत्ता कोतकर, आसाराम ठुबे, अमोल कोतकर, अविनाश मुसळे, साहिल शेख, राहुल पवार, दादा चन्ने, ऋषी बाराहाते, अनिकेत साळवे, मुन्ना शिंदे, रवि कोतकर, झरेकर, रोकडे, आठरे आदींसह परिसरातील नागरिक मोठय़ा संख्येने सहभागी होते.

निवेदनात म्हटले आहे, केडगाव-नेप्ती रस्त्यावर मागील अनेक वर्षांपासून खड्डे पडलेले असून, त्यामुळे अपघात होत असतात. या भागातील नागरिकांना कायमच या त्रासाला सामारे जावे लागत आहे. यापूर्वीही या रस्त्यासाठी अनेक सामाजिक संस्थांनी निवेदन दिलेले आहे. काही महिन्यांपूर्वी संथगतीने कामाची सुरुवात झालेली होती. परंतु काही महिन्यांपासून तेही काम बंद आहे. या रस्त्याचे टेंडर झालेले असून, त्याची वर्क ऑर्डर संबंधित ठेकेदाराला मिळूनही रस्त्याचे काम जलदगतीने पूर्ण होत नाही. त्यामुळे या रस्त्याचे काम जलदगतीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी यांनी आंदोलनाच्या ठिकाणी आले असता, आंदोलकांनी त्यांना निवेदन दिले. त्यावेळी उपविभागीय अधिकाऱयांनी 2 ऑगस्टपासून या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी कोतवाल पोलीस ठाण्याच्या वतीने मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.