खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा – कोल्हापूरला विजेतेपद, पुणे आणि साताऱ्याला उपवितेपद

राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचलनालयाच्या वतीने उदगीर येथील तालुका क्रीडा संकुलात स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा संघाने ग्रीको रोमन, फ्री स्टाईल व महिला गटात वर्चस्व गाजवीत सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. पुणे व सातारा संघाला उपविजेतेपदाचे मानकरी ठरले. तीन दिवस चाललेल्या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ सहसंचालक सुधीर मोरे यांच्या हस्ते झाला. क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी दुरदृष्य प्रणालीव्दारे या कार्यक्रमात सहभाग घेतला. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, उपसंचालक संजय सबनीस, क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, दिनेश गुंड राज्य क्रीडा मार्गदर्शक शिवाजी कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.

ग्रीको रोमन प्रकारात कोल्हापूर जिल्हा संघाने निर्विवाद वर्चस्व गाजवीत 172 गुणांसह विजेतेपदावर मोहर उमटवली. पुणे जिल्हा संघाला 90 गुणांसह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, तर सांगलीचा संघाला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. फ्री स्टाईल प्रकारात कोल्हापूर शहर संघाने सर्वाधिक 135 गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. पुणे शहर संघाला 130 गुणांसह दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. कोल्हापूर जिल्हा संघ 120 गुणांसह तिसऱ्या स्थानी राहिला. महिला गटात अपेक्षेप्रमाणे कोल्हापूर जिल्हा संघाने ११५ गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. सातारा संघाने 105 गुणांसह दुसरा, तर सांगली संघाने 105 गुणांसह तिसरा क्रमांक मिळविला. स्पर्धेतील सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकविजेत्यांना अनुक्रमे 60 हजार, 50 हजार व 30 हजार रुपयांची बक्षिसांनी गौरविण्यात आले. स्पर्धेतील सर्व विजेत्यांना प्रा. संजय दुधाणे लिखित ऑलिम्पिकवीर खाशाबा हे चरित्र पुस्तक भेट देण्यात आले. अवघ्या चार दिवसांच्या तयारीत गौतम छेड्डा यांच्या एसजीए व्यवस्थापनाने ही स्पर्धा यशस्वी करण्याचा विक्रमही उदगीरकरांनी अनुभवला.

क्रीडा सहसंचालक सुधीर मोरे यांनी आपल्या भाषणात स्पर्धेचा आढावा घेतला. खाशाबा जाधवांच्या ऑलिम्पिक यशाला उजाळा देण्यासाठी सुरू असलेली ही स्पर्धा उदगीरमध्ये अधिक उंचीवर पोहचली आहे. उदगीर सारख्या ग्रामीण भागात झालेल्या या कुस्ती स्पर्धेमुळे या भागातील खेळाडूंना मोठी संधी प्राप्त झाली आहे. राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. संजय बनसोडे यांनी प्रयत्न करून या स्पर्धा उदगीरला घेतल्या असून अतिशय सुंदर व नीटनेटके नियोजन करून या स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल आयोजकांचे त्यांनी कौतुक केले. उदगीर येथे झालेल्या या स्पर्धामुळे या भागातून अधिकाधिक खेळाडू राज्य व देशपातळीवर खेळू शकतील अशी अपेक्षा ठेवूनच मंत्री महोदयांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे असल्याचे मत यावेळी क्रीडा सहसंचालक सुधीर मोरे यांनी व्यक्त केले.