मलेरिया, डेंग्यू आणि लेप्टोची एकाचवेळी लागण झाल्याने कुर्ल्यातील मुलाचा मृत्यू

एकाच वेळी डेंग्यू, मलेरिया आणि लेप्टोस्पायरोसिस या तीन आजारांची लागण झाल्याचे एक दुर्मिळ प्रकरण मुंबईत दिसून आले आहे. कुर्ल्यातील एका 14 वर्षांच्या मुलाला या तीनही आजारांची लागण झाली होती. यामुळे या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे तीनही आजार पावसाळ्यात डोकं वर काढणारे आजार आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयात या मुलावर उपचार सुरू होते, मात्र डॉक्टर या मुलाचा जीव वाचवू शकले नाहीत. हा मुलगा कुर्ला पश्चिमेला राहात होता आणि त्याला सुरुवातीला ताप येत होता. त्यावेळी त्याला कावीळ झाल्याचे निदान करण्यात आले होते. 14 ऑगस्टला या मुलाला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तिथे त्याची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला नायर रुग्णालयात आणण्यात आले होते.

या मुलाचा वैद्यकीय इतिहास तपासला असला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्याच्यावर स्थानिक वैदूकडून उपचार करण्यात आले होते असं दिसून आले आहे. जवळपास आठवडावर या वैदूने त्याला इलाजाच्या नावाखाली काहीतरी औषधे दिली होती असे दिसून आले आहे. कस्तुरबा रुग्णालयात या मुलावर चाचण्या केल्या असता त्याला मलेरिया आणि डेग्यू या दोन्ही लागण झाली असल्याचे दिसून आले होते. यामुळे डॉक्टरही आश्चर्यचकीत झाले होते. या मुलावर पुन्हा चाचण्या केल्या असता त्याला लेप्टो स्पायरोसिसचीही लागण झाल्याचे दिसून आले. या मुलाच्या शरीरातील क्रिएटिनिनची पातळी वाढली होती आणि त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. यामुळे त्याला पुढील उपचारासाठी मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात हलवण्यात आले होते. अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू होते आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला.

या मुलाच्या फुफ्फुसात समस्या निर्माण जाली होती ज्यामुळे त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता. नायर रुग्णालयात त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र त्याचा जीव वाचू शकला नाही. नायर रुग्णालयातील प्राध्यापक आणि औषध विभागाचे प्रमुख डॉक्टर गिरीश राजाध्यक्ष यांनी म्हटले की या मुलाला झालेला संसर्ग थांबवण्यासोबतच त्या संसर्गामुळे निर्माण होणाऱ्या विविध व्याधी आणि अवयव निकामी होणं थांबवण्याचा डॉक्टरांनी निकराचा प्रयत्न केला होता. पुढे ते म्हणाले की लेप्टोस्पायरोसिसचा जीवाणू साचलेल्या पाण्यात असतो आणि त्यातून मानवाला लेप्टोची लागण होत असते. डेंग्यू आणि मलेरिया हे दोन्ही आजार डासांच्या चावण्याद्वारे पसरतात आणि सध्या मुंबईत त्याचे प्रमाण बरेच वाढलेले आहे. मात्र आमच्याकडे आलेली ही केस वेगळी होती. मी माझ्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये तीन-तीन आजारांची बाधा झालेले 2- 3 रुग्णच पाहिले आहेत. या मुलाला आदीच वैद्यकीय मदत मिळाली असती तर त्याचा जीव वाचू शकला असता असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

मुंबईमध्ये सध्याच्या घडीला लेप्टोस्पायरोसिसची प्रकरणे तुलनेने कमी आहेत, परंतु डेंग्यू आणि मलेरियाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ही वाढत आहेत. मुंबई महापालिकेने मंगळवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार ऑगस्टमध्ये मलेरिया आणि डेंग्यूच्या दोन्ही रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मलेरियाच्या 959 रुग्णांची नोंद झाली असून, जुलैमध्ये हीत रुग्णसंख्या 721 आणि जूनमध्ये 676 इतकी होती. त्याचप्रमाणे डेंग्यूच्या रुग्णांची संख्या जुलैमध्ये 685 आणि जूनमध्ये 353 इतकी होती. ही रुग्णसंख्या ऑगस्टमध्ये 742 वर पोहोचली आहे.