ड्रोनला लटकावून दहशतवाद्याला पंजाबमध्ये पाठवले, सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या

पाकिस्तानातील कुख्यात दहशतवादी संघटना लश्कर-ए-तोयबाने ड्रोनच्या माध्यमातून दहशतवादी हिंदुस्थानात पाठवण्यास सुरूवात केली आहे. ड्रोनला लटकावून एका दहशतवाद्याला पंजाबमध्ये उतरवण्यात आल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली असून सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या दहशतवाद्याला पाठवण्यापूर्वी हे ड्रोन किती वजनाचा माणूस वाहून नेऊ शकतात याच्या चाचण्या घेण्यात आल्या होत्या. 70 किलो वजनापर्यंतचा माणूस ड्रोनने पाठवला जाऊ शकतो असे लक्षात आल्यानंतर दहशतवादी संघटनांनी दहशतवाद्यांना ड्रोनने हिंदुस्थानात पाठवण्यास सुरूवात केली आहे.

एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या हाती या ड्रोनची पाकिस्तानातील शकरबाग इथे सुरू असलेल्या चाचणीचे व्हिडीओ हाती लागले आहे. या व्हिडीओमध्ये एका दहशतवाद्याला ड्रोनला लटकावून ड्रोन उडवण्यात येत असून हा दहशतवादी एका विशिष्ट ठिकाणी पाण्यात पडत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. ज्या दहशतवाद्याला पाठवण्यात आलं आहे त्याला पैसे देण्यात आले असून त्याला पंजाबमध्ये स्थायिक होण्यास सांगितलं आहे. वेळ आल्यानंतर तुला पुढील कामगिरी सांगितली जाईल असं लश्कर-ए तोयबाने सांगितलं आहे. पंजाबमधील त्याच्या साथीदाराकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जमा करण्यासही या दहशतवाद्याला सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांत पाकिस्तानातून अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रे ड्रोनच्या मदतीने हिंदुस्थानात पोहचवण्याचे प्रमाण वाढले आहे.