डावाने विजयासाठी हिंदुस्थान सज्ज, पहिल्या डावात 271 धावांची आघाडी

हिंदुस्थानने आपल्या विजयाचा डाव गुरुवारीच खेळला होता. आता पहिला डाव 5 बाद 421 धावांवर घोषित करत वेस्ट इंडीजवर 271 धावांची निर्णायक आघाडी घेत आपल्या डावाच्या विजयाच्या दिशेने पावलेही टाकली. गुरुवारी पदार्पणात शतक झळकावणाऱ्या यशस्वी जैसवालचे द्विशतक ठोकण्याचे प्रयत्न 29 धावांनी कमी पडले.

आज हिंदुस्थानने आपली आघाडी द्विशतकापार नेली असली तरी पदार्पणातच शतक ठोकणारा सतरावा हिंदुस्थानी फलंदाज ठरलेल्या यशस्वी जैसवालचा पदार्पणातच द्विशतक साजरे करणारा पहिला हिंदुस्थानी फलंदाज होऊ शकला नाही. कसोटीचा दुसरा दिवस यशस्वी जैसवालच्या शतकाने गाजला. हिंदुस्थानचे सलामीवीर रोहित शर्मा आणि यशस्वी जैसवालने वैयक्तिक शतकांसह 229 धावांची विक्रमी भागी रचली. रोहितचे दहावे शतक 103 धावांवर थांबले, मात्र यशस्वीची खेळी 143 धावांवरही अभेद्य होती. शर्मानंतर शुभमन गिल लवकर बाद झाला, पण त्यानंतर आलेल्या विराट कोहलीने यशस्वीच्या साथीने 72 धावांची अभेद्य भागी रचली.

दुसऱया दिवसाचा खेळ थांबला तेव्हा यशस्वी 143 तर विराट 36 धावांवर खेळत होते. यशस्वी सकाळी मैदानात उतरला तेव्हा आज द्विशतकाचाही विक्रम करणार, अशी त्याची देहबोली दिसत होती. त्याने दीडशतक साजरे केले, पण त्याची 387 चेंडूंतली खेळी जोसेफने रोखली. तो 171 धावांवर बाद झाला. कसोटी इतिहासात आजवर 7 फलंदाजांनी पदार्पणातच द्विशतक ठोकले आहे, मात्र यात एकही हिंदुस्थानी फलंदाज नाही. ती कमतरता आज यशस्वी पूर्ण करणार असे वाटत असतानाच तो बाद झाला. त्याने विराटसह 110 धावांची भागी रचली. मग आलेल्या अजिंक्य रहाणेने निराशा केली. रोचच्या गोलंदाजीवर तो बाद झाला, पण त्यानंतर कोहली आणि जडेजाने विंडीजच्या गोलंदाजांना आणखी यश मिळू दिले नाही. मात्र उपाहारानंतर विराट 76 धावांवर बाद झाला आणि त्यानंतर 421 धावांवर रोहित शर्माने आपला पहिला डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. 271 धावांची आघाडी मिळविणारा हिंदुस्थान डावाने कसोटी जिंकणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे. फक्त त्या विजयावर हिंदुस्थान कधी शिक्कामोर्तब करतो, हेच औत्सुक्याचे आहे.