भाजप प्रवेश होताच चौकशी बंद, महाराष्ट्रातील नेत्यांची संख्या सर्वाधिक

‘भाजपमध्ये मी मस्त, निवांत आहे. शांत झोप लागते. आपल्यामागे चौकशी नाही, काही नाही…’ असं विधान पूर्वी काँग्रेसमध्ये असलेल्या आणि आता भाजपमध्ये असलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानावर सध्या भाजपसोबत असलेल्या अजित पवारांनीही सडकून टीका केली होती. ‘अशी वक्तव्ये आल्यानंतर सर्वसामान्य माणसाच्या मनात प्रश्न निर्माण होतो, नियम कायदा सर्वांसाठी सारखे असले पाहिजेत’ असे विधान अजित पवारांनी केले होते. पूर्वी ईडी, सीबीआय, आयकर विभाग यांच्या चौकशीचा ससेमिरा लागलेल्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच किंवा भाजपला मदत करताच त्यांच्या मागच्या सगळ्या चौकशा बंद झाल्या. अशा पद्धतीने चौकशा बंद झालेल्या नेत्यांमध्ये महाराष्ट्रातील नेत्यांची संख्या अधिक आहे. महाराष्ट्राखालोखाल नंबर पश्चिम बंगालचा आहे.

अशोक चव्हाण

8 डिसेंबर 2008 ते 9 नोव्हेंबर 2010 या काळात अशोक चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. आदर्श घोटाळ्यात त्यांचे नाव आल्याने त्यांना हे पद सोडावे लागले होते. चव्हाणांची ईडी आणि सीबीआयद्वारे चौकशी सुरू होती.

अजित पवार

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा झाल्याचा आरोप भाजपनेच केला होता. नोव्हेंबर 2018 मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या घोटाळ्यासाठी अजित पवारांनाच जबाबदार दाखवलं होतं. 23 नोव्हेंबर 2019 मध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा पहाटेचा शपथविधी गाजला. त्यानंतर ऑक्टोबर 2020 मध्ये सिंचन घोटाळ्यासंदर्भातील फाईल बंद करण्यात आली. शिखर बँक घोटाळ्यातही त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि चौकशीसाठीही बोलावले होते. 2 जुलै 2023 ला अजित पवार मिंधे आणि भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले तेव्हापासून ईडीने त्यांना चौकशीसाठी कधीही बोलावलेले नाही.

छगन भुजबळ

भाजपच्या किरोट सोमय्यांच्या तक्रारीवरून सध्याच्या मंत्रिमंडळातील मंत्री छगन भुजबळ आणि त्यांच्या पुतण्याला 2016 साली अटक करण्यात आली होती. 18 महिने त्यांनी तुरुंगात काढले. भुजबळांवर अजूनही 7 गंभीर स्वरुपाचे गुन्हे आहेत.

नारायण राणे

सध्या भाजपमध्ये असलेल्या नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबियांवर सोमय्यांनीच आरोप केले होते. राणे कुटुंबाने 300 कोटींचा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप केला होता. ईडीने या प्रकरणाचा तपास सुरु करून त्यांना नोटीस पाठवली होती. राणेंनी त्यांचा स्वाभिमानी पक्ष 9 एप्रिल 2019 मध्ये भाजपात विलीन करून टाकला. त्यापूर्वी ईडीने त्यांच्याविरोधातील तपास बंद केला होता.

प्रवीण दरेकर

मनसेतून भाजपमध्ये आलेल्या आणि विषानपरिषदेचे आमदार असलेल्या प्रवीण दरेकरांवरही मुंबई बँकेत 123 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला होता. 2016 साली भाजपमध्ये सामील झालेल्या दरेकरांना 2022 साली क्लीन चीट मिळाली होती.

विजयकुमार गावित

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असताना मंत्री असलेल्या विजकुमार गावित यांनी आदिवासी विकास विभागात 6 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप होता. त्यांच्याविरूद्ध चौकशी करण्यात आली आहे त्यांना मंत्रीपद सोडावे लागले होते. गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांच्या मुलीला खासदारकी मिळाली आणि 2015 मध्ये तपास यंत्रणेने त्यांना क्लीन चीट दिली.

बबनराव पाचपुते

पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या आणि आता भाजपमध्ये असलेल्या बबनराव पाचपुतेंवरही किरीट सोमय्यांनीच आरोप केले होते. त्यांनी पॉन्झी स्कीम चालत 10 लाख लोकांना फसवल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. पाचपुतेंवर कोणतीही कारवाई झाली नाही.

संजय राठोड

संजय राठोड यांचे नाव टीकटॉकस्टार पूजा राठोडच्या आत्महत्या प्रकरणात आले होते. या प्रकरणानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. राठोड यांनी मिंध्यांच्या सोबतीने गद्दारी करत 30 जून 2022 रोजी मंत्रीपदाची शपथ घेतली होती. यानंतर सध्याच्या मुख्यमंत्र्यांनी राठोड यांना पोलिसांनी क्लीन चीट दिल्याचे सांगितले होते.

यशवंत जाधव

मिंध्यांच्यासोबत असलेल्या यशवंत जाधव आणि त्यांची पत्नी यामिनी जाधव यांना 24 मे 2022 रोजी फेमा अंतर्गत चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. यापूर्वी 25 फेब्रुवारी 2022 रोजी आयकर विभागाने त्यांच्या घर कार्यालयावर छापे मारले होते. मिंधेंच्या सोबतीने जाधव दाम्पत्याने गद्दारी केल्यानंतर त्यांना ना ईडीने चौकशीसाठी बोलावले ना आयकर विभागाने पुन्हा छापेमारी केली.