…त्यांना खोटं बोलल्याशिवाय अन्न गोड लागत नाही, कमलनाथ यांचा भाजपवर निशाणा

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते कमलनाथ यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ते लोकं येतील आणि वेगवेगळ्या बाता मारतील, कारण ज्यांनी काही केले नाही त्यांच्याकडे फक्त बाता मारण्यापलिकडे काही नसते. ते वेगवेगळ्या घोषणाही करतील, आश्वासने देतील, पण तुम्हीच पाहिले आहे की, आजपर्यंत त्यांच्यापैकी कोणीही काही केलेले नाही अशा शब्दांत कमलनाथ यांनी भाजपवर टीका केली आहे. मी माझ्या आयुष्यातील 44 वर्षे तुम्हा सर्वांच्या सेवेत घालवली आहेत, आपण कधीही खोटी आश्वासने दिली नाहीत असेही त्यांनी सांगितले.

चौराई विधानसभेच्या बिचुआ आणि सौंसर विधानसभेच्या पारडसिंगा येथे जाहीर सभेत माजी मुख्यमंत्री कमलनाथ बोलत होते. ते म्हणाले की, अन्य जिल्ह्यातील लोकं छिंदवाडा विकास मॉडेलचे कौतुक करतात. त्यावेळी माझी छाती अभिमानाने फुगते. बाहेरची लोकं येतात आणि येतील, याआधीही अशी लोकं आली आणि मोठमोठ्या बाता मारुन गेली. मात्र त्यांच्या सर्व घोषणा खोट्या ठरल्या. ही लोकं खोटं बोलण्यासाठीच येतात. कारण जोपर्यंत ते खोटं बोलत नाहीत तोपर्यंत त्यांना अन्न गोड लागत नाही अशी टीकाही यावेळी केली.

कमलनाथ म्हणाले की, सशक्त संविधान ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची देशाला मोलाची देणगी आहे. देशातील लोकशाही आणि पारदर्शक निवडणूक पद्धतीचा पायाही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घातला आहे. त्यामुळे देशाचे संविधान मौल्यवा आहे. त्याच्या रक्षणासाठी आता आपण सर्वांनी पुढे येण्याची गरज आहे. आता ते पुन्हा सत्तेत आल्यास संविधानात बदल करण्याचा त्यांचा मानस आहे, अशी भीतीही कमलनाथ यांनी व्यक्त केली.