शेतकऱ्यांसाठी आमच्यावर गुन्हा दाखल झाला तर आम्ही गुंड का? सवाल करत निलेश लंके यांचा सुजय विखेंना टोला

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी राहुरीत सभा झाली. या सभेत लंके यांनी सुजय विखेंवर टिकास्त्र सोडले. तसेच नगरमध्ये कोणतीही विकासकामे झाली नाहीत, असा हल्लाबोल केला. 50 वर्षे आमची सत्ता आहे, असे म्हणता तर जिल्ह्यात कोणता प्रकल्प आणला, ते सांगा, असे म्हणत विखे यांच्यावर निशाणा साधला.

आपण आपले प्रश्न मांडण्यासाठी त्यांना संसदेत पाठवले. मात्र, त्यांनी पाच वर्षात एकदाही शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत मांडले नाहीत. एकीकडे म्हणायचे 50 वर्ष या जिल्ह्यात आमची सत्ता आहे. पण, एखादा तरी चांगला प्रोजेक्ट तुम्ही आणला का? असा सवालही लंके यांनी विखे यांना केला आहे. राहुरीत झालेल्या सभेत निलेश लंके यांनी सुजय विखे यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. देशात संविधान बदलण्याचे मनसुबे रचले जात आहेत, लोकशाही धोक्यात आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठी मला तुमचे मत हवे आहे, असे लंके म्हणाले.

सुजय विखे म्हणतात आमची गुंडगिरी मोडून काढू. पण, माझ्या विवरण पत्रात माझ्यावर केवळ एक गुन्हा दाखल आहे. तो पण शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळावा म्हणून केलेल्या रास्ता रोको आंदोलनाचा आहे. शेतकऱ्यांसाठी आमच्यावर गुन्हा दाखल झाला तर आम्ही गुंड का? असा सवाल निलेश लंके यांनी सुजय विखेंना केला आहे. एकेकाळी आपल्या देशाला कृषीप्रधान देश म्हणून ओळखले जात होते. पण याच देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होतात. शेती मालाला भाव नाही, शेतकऱ्यांच्या दुधाला भाव नाही. असे असताना शेतकरी कसा सुखी होणार आहे? असा सवाल निलेश लंके यांनी उपस्थित केला आहे.