Lok Sabha Election 2024 : भाजप 200 पार जाणार नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान नाहीत तर गुजरातचे पंतप्रधान आहे. त्यामुळे लोकांनी आता धडा घ्यावा. नवीन सर्व्हेनुसार लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप देशात कुठेही 200 पार जाणार नाही, असा अंदाज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आज व्यक्त केला.

प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी व भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले की, 2014 पासून आतापर्यंत 17 लाख कुटुंबांनी हिंदुस्थानचे नागरिकत्व सोडून परदेशी नागरिकत्व स्वीकारले आहे असे सरकार स्वतःच सांगत आहे.

आचारसंहितेचा भंग

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असतानाही केंद्र सरकारने इथेनॉलवरील बंदी उठवून आचारसंहितेचा भंग केला आहे. पेट्रोल आणि डिझेलमध्ये वीस टक्के इथेनॉल तयार करण्याची परवानगी काही जणांना दिली होती. त्यामागील राजकारण इचलकरंजीच्या सभेत मांडले होते. त्याचे परिणाम आता दिसायला लागले आहेत, असे त्यांनी सांगितले.

समान नागरी कायदा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशात समान नागरी कायदा लागू करणार असे वक्तव्य एका सभेत केले होते. त्यावर भाष्य करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, समान नागरी कायदा भाजपने करून दाखवावा.  पण भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेईल असे मला वाटत नाही. कारण तो संसदेचा कायदा आहे. संविधानाने प्रत्येक धर्माला सुरक्षा दिलेली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.