आरएसएसनेच काँग्रेसमध्ये पाठवले होते, घरवापसीनंतर उमेदवाराने फोडले भाजपचे बिंग

लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी कुठल्याही थराला जाण्याची भाजप आणि आरएसएसची तयारी असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच आपल्याला काँग्रेसमध्ये पाठवले होते, असा गौप्यस्फोट करत भाजपच्याच उमेदवाराने त्यांचेच बिंग फोडले आहे. या गौप्यस्पोटामुळे फोडाफोडीचे राजकारण करणारे मोदी सरकार पुन्हा एकदा तोंडावर आपटले आहे.

370 चे टार्गेट गाठण्यासाठी भाजप विरोधी पक्षांतील बडय़ा नेत्यांना आपल्याकडे खेचत असल्याचे चित्र आहे. मध्य प्रदेश भाजपने काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या तिकिटावर मऊ येथून विधानसभा निवडणूक लढवणारे रामकिशोर शुक्ला यांना काँग्रेसमधून तोडले आहे. शुक्ला पूर्वी भाजपमध्येच होते, परंतु विधानसभा निवडणुकांप्रसंगी ते काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. त्या वेळी ते 29,144 मतदानासह तिसऱया क्रमांकावर होते. मऊ मतदारसंघातून भाजप नेत्या उषा ठाकूर यांनी विजय मिळवला होता. माजी काँग्रेस सदस्य आणि अंतर सिंह दरबार यांचा ठाकूर यांनी 43,392 मतांनी पराभव केला होता. निवडणुकीत रामकिशोर शुक्ला यांचे डिपॉझिटही जप्त झाले होते.