जे एकदाही भवानीमातेच्या दर्शनाला गेले नाहीत, ते महाराष्ट्राला काय न्याय देणार? उद्धव ठाकरे यांचा मोदी-शहांवर हल्ला

शिवसेनेच्या मशाल गीतामधील ‘जय भवानी’ शब्दाला आक्षेप घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे स्वतः मात्र राम राम करत महाराष्ट्रात फिरत आहेत. तुळजापूरची भवानीमाता ही महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. पण गेल्या दहा वर्षात मोदी आणि शहा एकदाही भवानीमातेच्या दर्शनाला गेले नाहीत, मग ते महाराष्ट्राला काय न्याय देणार? असा खणखणीत सवाल उद्धव ठाकरे यांनी आज केला.

‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उद्घाटनावेळी आपण नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन पूजा केली होती. मी काळाराम मंदिरात जाणार असे जाहीर केल्यावर मोदीही तिकडे घाईघाईने झाडू घेऊन पोहोचले होते. पण निवडणूक प्रचारासाठी महाराष्ट्रभर फिरत असताना ते एकदाही तुळजाभवानीसमोर जाऊन नतमस्तक झाले नाहीत, अशी खंत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

महाविकास आघाडी एक असताना आघाडीतील पक्षांचे वेगवेगळे जाहीरनामे का काढले जात आहेत, असा प्रश्न यावेळी माध्यमांनी उपस्थित केला. त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही आघाडी केली म्हणजे पक्ष एकमेकात विलीन केलेले नाहीत, प्रत्येक पक्षाचा स्वतंत्र विचार आणि मते आहेत.

याप्रसंगी शिवसेना नेते दिवाकर रावते, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, अरविंद सावंत आणि रवींद्र मिर्लेकर उपस्थित होते.

पराभव दिसल्याने भाजप राम राम करतेय

भूत पाहिले की आपण राम राम राम राम म्हणतो तसे लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव दिसू लागल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे राम राम म्हणू लागलेत, अशी बोचरी टीकाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. मोदीशहा यांच्याकडून महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर सातत्याने टीका होत असल्याबद्दल माध्यमांनी यावेळी त्यांना विचारले होते. त्यावर, आता जायची वेळ आल्याने मोदीशहा आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा असे म्हणताहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.