‘वापरा आणि फेकून द्या’ ही भाजपची नीती, रोहित पवारांचा अजित पवारांना इशारा

बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे या लोकसभेसाठी उमेदवार असणार आहेत. त्यावरून भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेला रोहित पवार यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

वापरा आणि फेकून द्या ही भाजपची नीती जगजाहीर असल्याचा टोला यावेळी रोहित पवार यांनी भाजपला लगावला. ते म्हणाले की, सहा दशकं महाराष्ट्राची व देशाची सेवा करणाऱ्या पवार साहेबांचा पराभव करणं हे कपटी भाजपचं लक्ष्य आहे. चंद्रकांत दादांनी केलेल्या वक्तव्यावरुन ते स्पष्ट झालं. पण त्यांना त्यासाठी बंदूक मात्र अजित दादांच्या खांद्यावरून चालवायची आहे. ‘वापरा आणि फेकून द्या’ ही भाजपची नीती जगजाहीर आहे, असं म्हणत रोहित पवारांनी अजित पवारांना सूचक इशारा दिला.

सध्याच्या राजकीय घडामोंडीवरून रोहित पवारांनी अजित पवारांना प्रश्न विचारला आहे. ते म्हणाले की, ज्यांनी आपल्याला या राजकीय स्थानापर्यंत पोहोचवलं त्या शरद पवार साहेबांच्या पराभवासाठी आपला वापर करुन द्यायचा की नाही, हे अजित दादांनीच ठरवायचं आहे. त्यांना जर हे ठरवता येत नसेल तर त्यांच्यासोबत असलेल्या पण पवार साहेबांवर प्रेम करणाऱ्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी ते ठरवावं, असं म्हणत त्यांनी आमदार आणि पदाधिकाऱ्यांना आवाहन केले आहे.

पवार साहेबांना संपवणं हे भाजपला कधीच शक्य होणार नसल्याचं त्यांनी यावेळी ठामपणे सांगितलं. ते म्हणाले की, पवार साहेब ही व्यक्ती नाही तर तो एक विचार आहे. हा विचार संपवणं भाजपला कदापि शक्य होणार नाही, हे भाजपने लक्षात ठेवावं, असा थेट इशारा रोहित पवार यांनी भाजपला दिला आहे.