लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपची बनवाबनवी; मुलुंडमधील पुनर्वसन प्रकल्पावरून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न

लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागते. अशा वेळी कोणताही शासन निर्णय घेतला जात नाही. मात्र, असे असतानाही भाजपचे मुलुंडचे आमदार आणि ईशान्य मुंबई मतदारसंघाचे उमेदवार मिहीर कोटेचा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून मुलुंडमधील धारावी आणि इतर प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाला तात्पुरती स्थगिती देण्याची मागणी केली आहे. मात्र, हा निव्वळ सहानुभूती मिळवण्याच प्रकार असून भाजपचे उमेदवार हे मुलुंडकरांबरोबर बनवाबनवी करत आहेत, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते अॅड. सागर देवरे यांनी केला आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार राज्यात असताना जून 2022 मध्ये मुलुंडमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, याला डेव्हलपमेंट परमिशन जून 2023 मध्ये एकनाथ शिंदे आणि भाजपचे सरकार सत्तेत असताना देण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात ऑगस्ट 2023 मध्ये झाली. त्यावेळी सरकारच्या या निर्णयाला भाजपचे स्थानिक आमदार असलेल्या मिहीर कोटेचा यांनी विरोध का केला नाही, असा प्रश्न देवरे यांनी विचारला आहे.

 

मतदारांच्या डोळय़ांत धूळफेक 

आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिहीर कोटेचा यांनी या प्रकल्पाला विरोध करत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. पत्रात धारावी आणि इतर पुनर्वसन प्रकल्पांना तूर्तास स्थगिती द्यावी, अशी मागणी केली आहे. मात्र, आचारसंहिता लागली असताना अशी मागणी करणे म्हणजे मतदारांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासारखे आहे, असे आरोप देवर यांनी केला आहे.

 

कोटेचा यांनी विरोधाचे नाटक करू नये!

मुलुंडमध्ये होणाऱया पुनर्वसन प्रकल्पाविरोधात मुलुंडकर केल्या 5 ते 6 महिन्यांपासून आंदोलन, उपोषण करत असून लोकांमध्ये जनजागृती करत आहेत. त्याचबरोबर कोटेचा म्हणतात की, त्यांनी डिसेंबर 2023 च्या अधिवेशनात या प्रश्नाबाबत आवाज उठवला होता. त्याबाबतचे त्यांचे व्हिडीओ निवडणुकीच्या तोंडावर व्हायरल केले जात आहेत. मात्र, सरकारने त्यावर काय उत्तर दिले, सरकारची याबाबतची भूमिका काय आहे, मुलुंडकरांना सांगितले जात नाही. मुंबई महापालिकेत सुधार समितीच्या बैठकीतही भाजप नगरसेवकांनी या प्रकल्पाला परवानगी दिली होती. त्यामुळे कोटेचा यांनी विरोधाचे नाटक थांबवावे. हा केवळ चुनावी जुमला असून अशा जुमल्याला मुलुंडकर फसणार नाही, असा इशारा सागर देवरे यांनी दिला आहे.